बातम्या

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनेलचा दोन हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी होईल.....मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

Minister Hasan Mushrif is confident that the Mahayuti panel


By nisha patil - 4/9/2026 11:26:00 PM
Share This News:



गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनेलचा दोन हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी होईल.....मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास
          
डिसेंबरमध्ये प्रताप उर्फ भैया माने आमदारकीची शपथ घेतील

        
कागल, दि. ४: कुणी काहीही म्हणू देत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनेलचा दोन हजारांहून अधिक मताधिक्याने दणदणीत विजय होईल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. तसेच, प्रताप उर्फ भैया माने येत्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर महिन्यात नागपूरमध्ये विधानपरिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतील, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.
​            
कागलमध्ये मतदार याद्यांचे पुनरीक्षण, गोकुळ दूध संघ निवडणूक, केडीसीसी बँक निवडणूक या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या नियोजनाच्या बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
​         
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, गाव- खेड्यातील छोट्या- छोट्या दूध संस्थांच्या अस्तित्वासाठी अगदी सहकार न्यायालयापासून उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाची दारे ठोठावावी लागली. "सत्यमेव जयते...."  या भावनेने हा लढा देत राहिलो आणि आज गोकुळ दूध संघाची अंतिम यादी प्रसिद्ध झाली. एकही दूध संस्था त्यामधून बाहेर पडली नाही, याचा मला विशेष आनंद आहे.
​         
ते पुढे म्हणाले, मी सातत्याने सांगत होतो की आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. महायुतीचाच विजय होऊन महायुतीचीच सत्ता येणार आहे. असे असतानाही एवढा त्रास का झाला, याचे उत्तर आजही अनाकलनीयच आहे. आज सगळ्याच गोष्टी मी बोलणार नाही, असे ते म्हणाले. सत्याच्या या लढ्यामध्ये सबंध कोल्हापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादीसह शिवसेना शिंदे गट, जनसुराज्य पक्ष या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि प्रमुखांनी भरभरून साथ आणि पाठबळ दिले. किंबहुना;  संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यानेच या लढ्याला पाठिंबा दिला. त्यामुळेच हा लढा जिंकता आला. 
      
गावागावातील कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांच्या पुनरिक्षण मोहिमेबद्दल सजग आणि सतर्क रहा  एकही पात्र मतदार यादीतून बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्या. दसऱ्याच्या आधीपासूनच गोकुळच्या ठरावधारकांनी सहलीवर जायची तयारी ठेवा. केडीसीसी बँकेच्या ठरावधारकांनीही वेळेवर ठराव दाखल करावेत, असेही ते म्हणाले.
​         
डिसेंबरमध्ये भैय्या माने यांचा शपथविधी......!      
श्री. मुश्रीफ म्हणाले, पदवीधर मतदार नोंदणीमध्ये पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहेच. विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघात केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने हेच आमदार म्हणून विजयी होतील. येत्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर महिन्यात ते विधानपरिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
​             
सूचक व मार्मिक शेरोशायरी.......!            
या भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सुचक अशी शेरोशायरीही म्हटली.....,
१. "सच को दबाने की कोशिशें हजार हों फिर भी सच कभी हारता नहीं,"
"वक्त का फैसला जब होता है तो विजय सत्य की होती है।"
               
२. "झूठ का शोर चाहे जितना भी हो, जीत हमेशा सच की होगी।"
            
व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, पंचायत समितीचे उपसभापती डाॅ. इंद्रजित पाटील, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, गडहिंग्लजचे प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे, माजी नगराध्यक्ष राजू खनगावे, बिद्रीसाखरचे संचालक पैलवान रवींद्र पाटील- बानगेकर, बिद्रीसाखरचे संचालक सुनीलराज सूर्यवंशी, बिद्री साखरचे संचालक आर. व्ही. पाटील- सुरुपलीकर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब तुरंबे, देवानंद पाटील, संजय चितारी, सुनील दिवटे, राजेंद्र माने, दत्ता पाटील- केनवडेकर, प्रवीण काळबर, रश्मीराज देसाई, अमर सनगर आदी प्रमुख उपस्थित होते.
​               
स्वागत निढोरीचे माजी सरपंच देवानंद पाटील यांनी केले. प्रास्ताविक केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. आभार राष्ट्रवादीचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी यांनी मानले.


गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनेलचा दोन हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी होईल.....मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास
Total Views: 17