बातम्या

लघु आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी व सिद्ध औषध उत्पादकांच्या अडचणींबाबत मंत्री योगेश कदम यांची सकारात्मक भूमिका

Minister Yogesh Kadam takes a positive stance regarding


By nisha patil - 12/8/2026 3:35:46 PM
Share This News:



लघु आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी व सिद्ध औषध उत्पादकांच्या अडचणींबाबत मंत्री योगेश कदम यांची सकारात्मक भूमिका

आयुष स्मॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाची मंत्रालयात भेट; जाचक नियमांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यासह विविध मागण्यांवर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन

मुंबई, दि. ११ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्रातील आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी व सिद्ध औषधी उत्पादने तयार करणाऱ्या लघु व मध्यम उत्पादकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आयुष स्मॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. श्री. योगेशजी कदम यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन सविस्तर निवेदन साद करण्यात आले.

दिनांक २४ जुलै २०२६ रोजीच्या GSR 657(E) अधिसूचनेनुसार तसेच Schedule T मधील नव्या GMP निकषांनुसार लघु उत्पादकांवर लागू होणाऱ्या विविध जाचक अटी व नियमांची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्याचा लघु उद्योगांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन सदर अटींच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

छोट्या उत्पादकांच्या प्रमुख मागण्या

असोसिएशनच्या निवेदनामध्ये खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या :

1. GSR 657(E) अधिसूचनेतील जाचक अटींच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती देऊन लघु उत्पादकांच्या प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा करावी.


2. Schedule T मधील नवीन GMP निकष लागू करण्यासाठी लघु उद्योगांना पुरेसा संक्रमण कालावधी (Grace Period) देण्यात यावा.


3. उत्पादनांच्या Stability Study संदर्भातील नियमांमध्ये लघु उत्पादकांसाठी व्यवहार्य व सुलभ तरतुदी कराव्यात.


4. राज्य FDA कडून मंजूर होणाऱ्या उत्पादनांची नोंदणी e-Aushadhi पोर्टलवर Auto Migration पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.


5. QR Code, GTIN, Barcode व नवीन Product Code प्रणाली लघु उद्योगांना सक्तीची करू नये अथवा त्यासाठी सुलभ व टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी.


6. Risk Based Inspection, QA/QC, Microbiology Laboratory, Validation, HEPA Filter, Air Handling System इत्यादी सुविधा उद्योगाच्या उत्पादन क्षमतेनुसार व जोखमीच्या स्वरूपानुसार लागू कराव्यात.


7. लघु उत्पादकांना आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासकीय अनुदान व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे.


8. आयुर्वेदातील ग्रंथोक्त उत्पादनांच्या पारंपरिक पद्धतींचा विचार न करता प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र तांत्रिक मनुष्यबळ व स्वतंत्र सुविधा अनिवार्य करण्याऐवजी लघु उद्योगांसाठी स्वतंत्र व व्यवहार्य धोरण तयार करावे.


9. महाराष्ट्र राज्यातील विद्यमान उत्पादन परवाना व तपासणी व्यवस्था सक्षम ठेवून, नव्या प्रणाली लागू करताना लघु उत्पादकांना अनावश्यक अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.


10. उत्पादनांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी प्रत्येक शहरात उपलब्ध असलेल्या विज्ञान शाखेची महाविद्यालये, D. Pharmacy/B. Pharmacy महाविद्यालये, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तसेच मान्यताप्राप्त शासकीय व खाजगी प्रयोगशाळांना आवश्यक निकषांनुसार चाचणी करण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.


11. प्रस्तावित AYUSH e-Portal संदर्भात लघु उत्पादकांच्या अडचणी व व्यवहार्य पर्यायांचा विचार होईपर्यंत त्याची अंमलबजावणी स्थगित ठेवावी किंवा संक्रमण कालावधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

“आयुर्वेदाच्या पारंपरिक ज्ञानासोबत आधुनिक गुणवत्ता व्यवस्था आवश्यक; मात्र लघु उत्पादकांसाठी नियम व्यवहार्य असावेत”

यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध व युनानी या भारतीय पारंपरिक उपचार पद्धतींचा मोठा वारसा आहे. आयुर्वेदातील अनेक उत्पादने ग्रंथोक्त संदर्भ, पारंपरिक पद्धती व दीर्घकाळापासून प्रचलित उत्पादन प्रक्रियेच्या आधारे तयार केली जात आहेत.

मात्र मोठ्या अॅलोपॅथिक फार्मास्युटिकल उद्योगांच्या धर्तीवर सर्वच नियम व पायाभूत सुविधा लघु उत्पादकांवर एकाच वेळी बंधनकारक केल्यास त्याचा मोठा आर्थिक भार या उद्योगांवर पडू शकतो. परिणामी गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत असलेल्या अनेक लघु उत्पादकांसमोर उत्पादन व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

गुणवत्ता, सुरक्षितता आणि ग्राहकांचे हित हे सर्वाधिक महत्त्वाचे असून त्याबाबत कोणतीही तडजोड न करता, लघु उद्योगांची आर्थिक व तांत्रिक क्षमता लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने आणि व्यवहार्य पद्धतीने नियम लागू करावेत, अशी भूमिका असोसिएशनने मांडली.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील उत्पादकांची उपस्थिती

या शिष्टमंडळामध्ये आयुष स्मॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. दीपक महाजन, सुवर्णवेद फार्माचे श्री. शिवानंद कुंभार (उपाध्यक्ष), संपूर्ण जीवनचे श्री. बाळासाहेब पाटील (सहसचिव), कृपा औषधालयचे श्री. राजन दळी, LK Pharma चे श्री. मालशे, श्रीकृष्ण औषधालयचे श्री. अशोक अभ्यंकर, सिंधुदुर्गचे श्री. नानोसकर, सौ. वैदेही, Shitvalkal Pharma चे श्री. अतुल खोत, रायगडचे श्री. वैद्य, अलिबागचे डॉ. सुहास म्हात्रे (Subio Lifecare), Kokan Pharmaceuticalsचे प्रतिनिधी प्रसाद सोमकांत नानोसकर, सोमकांत शांताराम नानोसकर, Kolhapur येथील Snehakavachचे श्री. चंद्रकांत कुंभार तसेच असोसिएशनचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मंत्री योगेश कदम यांचे सकारात्मक आश्वासन

सदर निवेदनाची दखल घेत मा. मंत्री श्री. योगेशजी कदम यांनी लघु उत्पादकांच्या समस्या समजून घेत लवकरात लवकर संबंधित विभाग व असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करून या विषयावर योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

लघु उद्योजकांचे उद्योग टिकून राहावेत, त्यांच्यावर अनावश्यक आर्थिक व प्रशासकीय भार पडू नये आणि त्याचवेळी उत्पादनांची गुणवत्ता व ग्राहकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी योग्य तो समतोल साधण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

या सकारात्मक भूमिकेबद्दल आयुष स्मॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने मा. मंत्री श्री. योगेशजी कदम यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

“लघु आयुष उत्पादक टिकले तरच आयुर्वेदाची पारंपरिक ज्ञानपरंपरा आणि स्थानिक उत्पादन व्यवस्था अधिक सक्षमपणे पुढे जाईल,” असा विश्वास यावेळी उपस्थित उत्पादकांनी व्यक्त केला.


लघु आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी व सिद्ध औषध उत्पादकांच्या अडचणींबाबत मंत्री योगेश कदम यांची सकारात्मक भूमिका
Total Views: 6