बातम्या
आजरा नगरपंचायतीची मासिक सभा संपन्न
By Administrator - 3/18/2026 12:21:16 PM
Share This News:
आजरा नगरपंचायतीची मासिक सभा संपन्न
विविध विषयावर चर्चा... पाणी प्रश्नावर नगरसेवक आक्रमक
आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीची मासिक सभा नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्षा पूजा डोंगरे, मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांच्या उपस्थितीत कै. काशिनाथअण्णा चराटी सभागृहात पार पडली. विषयांचे वाचन निहाल नायकवडी यांनी केले.सभेमध्ये सर्व विषयावर चर्चा झाली यामध्ये पाणी पुरवठा विभागाच्या कारभाराबाबत नगरसेवकांनी तिव्र नाराजी व्यक्त करीत प्रथमच सभेसमोर आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे ठेकेदार आर. डी. देसाई यांच्यासह पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी मानसी कदम यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
नगरसेवक असिफ पटेल आणि परेश पोतदार यांनी आक्रमक पवित्रा घेत श्रीमती कदम यांना थेट बदली करून घेण्याचा सल्ला दिला. परेश पोतदार यांनी म्हटले की, तुम्ही पगार घेऊन येथे काम करता परंतु आम्ही कोणताही पगार न घेता येथे जनतेसाठी काम करतो. प्रत्येकवेळी जनता आम्हाला विचारत असते. तुमच्या चुका आम्हाला बदनाम करतात जमत नसेल तर बदल्या करून घ्या असे स्पष्ट सांगितले.
डॉ. स्मिता कुंभार यांनी महिलासाठी बाजारपेठेत स्वछतागृहे बांधण्याबाबत सूचना मांडली. शिवतीर्थ व कुमार भवन जवळ ही स्वच्छता गृहे नसावीत असेही स्पष्ट केले. बामणे भाऊजी यांनी म्हटले की, स्वछता गृहे कितीही हायटेक असली तरी त्यांचे वेळेत मेंटेनन्स आणि स्वछता महत्वाची आहे.
सभेमध्ये नगरपंचायत मालकीची सुमारे 135 दुकान गळ्यापैकी नगरपंचायत मुख्य इमारत, विद्याधन कॉम्प्लेक्स, हनुमान कॉम्प्लेक्स याठिकाणच्या गळ्यांची भाडेवाढ करण्याबाबत चर्चा झाली तर लहान खोकीधारक, भाजीपाला गाळे इ. लहान गाळेधारकांना भाडेवाढ करू नये अशी सूचना असिफ पटेल यांनी मांडली. उत्पन्नाच्या नादात गोरगरीब व्यवसायिकांना भरडू नका याला माझा विरोध असेल असे त्यांनी म्हटले. शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करून खोके व गाळे उभारण्यात आले आहेत नगरपंचायतीने आपल्या अधिकाराचा वापर करून खोके व गाळे तातडीने काढावेत अशा सूचना केल्या. मूळ भाडेकरूना नोटीस बजावून पोट भाडेकरू न काढल्यास सद्या असणाऱ्यांनाच व गरजू व्यक्तींनाच मूळ भाडेकरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पाणी पुरवठा ठेकेदारास सभेमध्ये हजर करण्यास भाग पाडले. डॉ. स्मिता कुंभार यांनी म्हटले की, ठेकेदार जुने आहेत. पहिला ठेका सुद्धा आपणच घेतला होता. परिसराची माहिती असतानासुद्धा पाणी व्यवस्थापन व्यवस्थित का होत नाही? 90%योजना पूर्ण झाली म्हणून सांगता 90घरामध्ये तरी व्यवस्थित पाणी येते का? असा सवाल केला त्याचप्रमाणे पाणी योजनेचे सादरीकरण करून इंजिनिअर जोशी यांनी दाखवावे असे अभिषेक शिंपी यांनी सांगितले.
पाचवर्षे आणि नंतरच्या प्रशासक काळातही व्ही. डी. के. ला टेंडर दिले जवळपास 7 ते 8 कोटीचे काम दिले तरीसुद्धा शेवटच्या दोन तीन महिन्यात सेवा दिली नाही हे योग्य नाही असे अभिषेक शिंपी यांनी मत मांडले. तर आपण कचरा उठाव करीत नाही सद्यस्थितीत स्वच्छ भारत अभियान योजनेत भाग घेण्यास आपण पात्र आहोत का? असा प्रश्न बामणे भाऊजी यांनी विचारून संबंधित अधिकाऱ्यांना निरुत्तर केले. पुढे ते म्हणाले की, पाण्यासाठी आम्ही आंदोलने केली. ठरकेदाराला समोर आणा म्हणून ठिय्या केला परंतु आज कमीत कमी पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला दाखवला याबद्दल नगरध्यक्षांचे आभार तसेच जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही योजना हॅन्डओव्हर करू नये असेही त्यांनी सांगितले.
हनुमान संकुल येथील एका भाडेकरूने स्टॅम्पद्वारे आपल्या ताब्यातील गाळा दुसऱ्या व्यावसायिकास विकला असल्याने गाळे भाड्याने दिले आहेत की त्यांना नगरपंचायतीने विकले आहेत? असा प्रश्न परेश पोतदार यांनी उपस्थित केला. कुमार भवन शाळेनजिक असणारे अनाधिकृत गाळ्यांचा एक रुपयाही कर मिळत नसल्याचा प्रकार यावेळी उघडकीस आला.कर्मचारी आणि अधिकारी यांनी आपले हालचाल रजिस्टर ठेवण्याबाबत असिफ पटेल आणि परेश पोतदार यांनी सूचना मांडली.
अधिकारी वर्गाला नेमके दररोज पाणी किती सोडले जाते, किती वापरले जाते व किती वाया जाते याबाबत असिफ पटेल यांनी चांगलेच धारेवर धरले. तर अनिकेत चराटी यांनी पटेल कॉलनीला टँकरने पाणी देण्याची मागणी केली. तसेच याठिकाणी पाण्याची टाकी बांधण्याबाबत मागणी केली. सर्व शाळेत सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था करणेबाबत निशात चांद यांनी सूचना मांडली. तर शाळेच्या विद्यार्थिनींच्या संख्येनुसार मशीन बसवण्याची सूचना अभिषेक शिंपी यांनी मांडली. आठवडा बाजारचा फेर लिलाव करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
यावेळी नगरपंचायत अधिकाऱ्यांसह आसावरी खेडेकर, अश्विनी चव्हाण, पूनम लिचम, कलावती कांबळे, असिफ सोनेखान, रेश्मा बुडडेखान, रहिमतबी खेडेकर, डॉ. इंद्रजित देसाई, विक्रम पटेकर आदिजण उपस्थित होते.
आजरा नगरपंचायतीची मासिक सभा संपन्न
|