बातम्या
जबाबदारीचं ओझं अन् मनात जगण्याची जिद्द': कष्टकऱ्यांची संघर्षगाथा*
By nisha patil - 5/27/2026 11:20:14 AM
Share This News:
*'जबाबदारीचं ओझं अन् मनात जगण्याची जिद्द': कष्टकऱ्यांची संघर्षगाथा*
**परप्रांतीय असले तरी ते आपल्या देशाचे नागरिक आहेत, त्यांचा आदर करा*
**आजरा(हसन तकीलदार)*:- जगण्यासाठी प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो, पण काही लोकांचा संघर्ष हा केवळ जगण्यासाठी नसून आपल्या कुटुंबाच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी असतो.आपल्या अशा आकांक्षावर पाणी फेरून कुटुंबासाठी दररोज 10 ते 6 15 किलोमीटर पायी चालणारे हे नायक आजपर्यंत दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या जीवनाच्या संघर्षाची गाथा अनामिकच राहिली आहे.
फोटोमध्ये दिसणारा हा परप्रांतीय व्यावसायिक मजूर त्याच संघर्षाचे एक जिवंत प्रतीक आहे. डोक्यावर बेकरीच्या पदार्थांचा—बटर, बिस्किटे, खारी—मोठा टोपला, खांद्याला अडकवलेली वजनदार पोती आणि पायात साध्या चपला. हा केवळ एक माल विकणारा विक्रेता नाही, तर तो आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे.कुटुंबाच्या स्वप्नांच्या ओझ्याची गाठोडी घेऊन कुटुंबाचा गाडा ढकलण्यासाठी मैलोन्मैलांचा प्रवास आणि अथांग कष्ट सोसत आपल्या पोटाची आणि कुटुंबाची भूक भागवण्यासाठी हा माणूस दररोज कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर पायपीट करतो. ऊन असो, वारा असो वा पाऊस, गल्लीबोळांतून फिरत "खारी-टोस्ट-बटर" अशी साद घालत त्याचा दिवस सुरू होतो. डोक्यावरचे ओझे जितके जड, तितकीच त्याच्यावर असलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही मोठी असतात. स्वतः मैलोन्मैल चालतो, जेणेकरून गावाकडे असणाऱ्या त्याच्या मुलांचे भविष्य स्थिर व्हावे, त्यांना चांगले शिक्षण मिळावे.त्यांचे भविष्य सुधारावे भविष्याची स्वप्ने घेऊन तो सकाळच्या प्रहरी गिऱ्हाईकाच्या शोधात आशा घेऊन बाहेर पडतो. ही मेहनत करताना डोळ्यासमोर एकच ध्येय आणि स्वप्न असते ते म्हणजे मुलांचे भविष्य आणि वर्तमानात कुटुंबाचे उदरनिर्वाह.
आजकालच्या जगात शॉर्टकट शोधणाऱ्यांची कमतरता नाही, पण अशा परिस्थितीतही घामाच्या प्रत्येक थेंबातून आणि प्रामाणिक कष्टाने आपली उपजीविका करणारी ही माणसं खऱ्या अर्थाने वंदनीय आहेत. परप्रांतीय असला तरी या मातीने त्याला आणि त्याच्या कष्टाला सामावून घेतले आहे. अशा कष्टाळू माणसांकडे केवळ एक परप्रांतीय मजूर म्हणून न बघता, त्यांच्या स्वाभिमानाचा आणि जिद्दीचा आदर करायला हवा.परप्रांतीय म्हटल्यावर त्याचाकडे बघण्याचा दृष्टिकोन लगेच बदलतो. राजनेत्यांनी आपल्या मतांच्या राजकारणासाठी परप्रांतीयांना आपल्या स्वतःच्या देशातही परके करून टाकले आहे. एखादा कोणीतरी गुन्हा करतो परंतु लक्ष्य मात्र सर्व परप्रांतीय होतात. आपली पत्नी, मुलं, कुटुंब सोडून तो फक्त आणि फक्त भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी आलेला असतो परंतु कधी कधी या राजकारणाचा बळी पडतो.त्यांचाही हा देश आहे, तेही या देशाचे नागरिक आहेत याचा विसर कदाचित या राजकारण्यांना आणि त्यांच्या समर्थकांना पडतो.
कधीकधी आपल्या दारात जेव्हा अशी कष्टाळू माणसं येतात, तेव्हा त्यांच्याशी चार शब्द प्रेमाचे बोलणे किंवा त्यांच्याकडून वस्तू घेताना दोन रुपयांसाठी हुज्जत न घालणे, हीच त्यांच्या कष्टाला दिलेली खरी पावती ठरेल.त्यांच्या जिद्दीला आणि कष्टाला मान दिला पाहिजे. घरासमोर आलेल्या भिकाऱ्याला आपण बिनदिक्कत पाच दहा रुपये सहज देतो परंतु संसाराच्या आणि जबाबदारीच्या ओझ्या बरोबर या साहित्याचे ओझे घेऊन आपल्या दारापर्यंत सेवा देणाऱ्यांना आपण मात्र एक दोन रुपयासाठी तोल मोल करीत बसतो. एखाद रुपया जादा देण्याची आपल्या मनात भावना तयार होत नाही हीच खरी शोकांतिका आहे.
"श्रमाची किंमत पैशात करता येईलही, पण त्या श्रमामागे असणाऱ्या कुटुंबाच्या ओढीची, प्रामाणिकतेची, काळजीची आणि निष्ठेची किंमत कधीच करता येत नाही.अशा फेरीवाल्यांचा आदर करा. त्यांच्या कष्टाला मान द्या. त्यांची अवहेलना करून त्यांच्याकडे शंकेच्या नजरेतून कधीच बघू नका. त्यांचेही मन आहे, भावना आहेत, तेही या देशाचे नागरिक आहेत.
दररोज एवढा खडतर प्रवास करून हसतमुखाने उपजीविका करणाऱ्या या खऱ्याखुऱ्या 'कष्टकऱ्याला' आणि त्याच्या जिद्दीला मनापासून सलाम!
शेवटी एकच संदेश माणूस म्हणून जगताना आपण जनावरांप्रती प्रेम दाखवतो परंतु माणूस मात्र माणुसकीला पोरका होतो.
जबाबदारीचं ओझं अन् मनात जगण्याची जिद्द': कष्टकऱ्यांची संघर्षगाथा*
|