बातम्या

विनापरवाना लॉजिंगवर महापालिकेचा हातोडा; ताराबाई रोडवरील लॉजिंग सील!

Municipal Corporation cracks down on unlicensed lodging


By nisha patil - 11/9/2026 3:26:04 PM
Share This News:



विनापरवाना लॉजिंगवर महापालिकेचा हातोडा; ताराबाई रोडवरील लॉजिंग सील!

महानगरपालिकेचा अधिकृत व्यवसाय परवाना न घेता सुरू असलेल्या ताराबाई रोडवरील लॉजिंगवर कोल्हापूर महानगरपालिका आणि अग्निशमन विभागाने संयुक्त कारवाई केली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरिफ मनेर यांच्या मालकीची लॉजिंग आज सील करण्यात आली. ताराबाई रोडवरील तीन मजली इमारतीमध्ये संबंधित लॉजिंग व्यवसाय सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. यापूर्वी परवाना विभाग आणि अग्निशमन विभागाकडून संबंधितांना नियमानुसार नोटीस देण्यात आली होती. मात्र, नोटीस देऊनही व्यवसाय परवाना घेण्यात आला नाही. तसेच परवाना मिळवण्यासाठी आवश्यक असलेला अर्जही महापालिकेकडे दाखल करण्यात आला नव्हता.

महापालिका प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज परवाना विभाग आणि अग्निशमन विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत संबंधित लॉजिंग सील केली. ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

या कारवाईत परवाना अधीक्षक अशोक यादव, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, स्थानक अधिकारी जयवंत खोत, विजय सुतार, परवाना निरीक्षक संदीप भोई, शिवाजी कोकरे, भोलानाथ पाटणकर यांच्यासह अग्निशमन आणि परवाना विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. कोल्हापूर शहर हद्दीतील सर्व व्यावसायिक आणि आस्थापनाधारकांनी महापालिकेचा अधिकृत व्यवसाय परवाना प्राप्त केल्यानंतरच व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.


विनापरवाना लॉजिंगवर महापालिकेचा हातोडा; ताराबाई रोडवरील लॉजिंग सील!
Total Views: 14