बातम्या
गोखले कॉलेज ते मंगेशकर नगर परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई
By nisha patil - 10/9/2026 7:35:39 PM
Share This News:
गोखले कॉलेज ते मंगेशकर नगर परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई
अनधिकृत हातगाड्या, पत्रा पेट्या, लोखंडी स्ट्रक्चरसह साहित्य जप्त
महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी कारवाईवेळी प्रत्यक्ष उपस्थिती
कोल्हापूर, ता. १० : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ व अतिक्रमण निर्मूलन पथकाच्यावतीने गोखले कॉलेज ते मंगेशकर नगर परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत हातगाड्या व इतर अतिक्रमणांवर आज धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईची महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी केली. या कारवाईमध्ये ३ लोखंडी पायाड स्ट्रक्चर, २ हातगाड्या, १ लोखंडी कपाट, १ स्टॅंड बोर्ड, १ लोखंडी पाईप बोर्ड, ८ पत्रा पेट्या, २ पत्रे तसेच इतर अनधिकृत साहित्य जप्त करण्यात आले.
महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केल्यानंतर काही हातगाडीधारक व विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांनी स्वतःहून आपले साहित्य हटविले. मात्र, महापालिकेच्या पथकाकडून वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटविणाऱ्या व्यावसायिकांवर प्रत्यक्ष कारवाई करून त्यांचे अनधिकृत साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, आजच्या कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे तसेच नागरिकांना त्रासदायक ठरणारे अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची कारवाई यापुढेही सातत्याने करण्यात येणार आहे. नागरिक व व्यावसायिकांनी सार्वजनिक रस्ते व पदपथांवर अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत तसेच अतिक्रमण निर्मूलन पथक व विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचारी सहभागी झाले होते.
गोखले कॉलेज ते मंगेशकर नगर परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई
|