बातम्या
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; सोहाळे व सोहाळेवाडी येथे १,५०० रोपांचे वृक्षारोपण*
By nisha patil - 7/13/2026 11:44:40 PM
Share This News:
*'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; सोहाळे व सोहाळेवाडी येथे १,५०० रोपांचे वृक्षारोपण*
**आजरा(हसन तकीलदार)*:-कृषी विभाग व जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या अभिनव उपक्रमांतर्गत आज मौजे सोहाळे येथे शेतकरी रणजित देसाई यांच्या शेतात भात रोपलावणी कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शेतीची कामे प्रत्यक्ष करून कृषी क्षेत्राशी बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी सोहाळे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. भारती डेळेकर, सामाजिक वनीकरण गडहिंग्लजच्या वनक्षेत्रपाल श्रीमती कल्याणी गोडसे, पंचायत समिती आजराचे विस्तार अधिकारी बी. टी. कुंभार, ग्रामसेवक अजित रणदिवे, वनपाल संजय निळकंठ, दिपक कदम वनरक्षक, विद्या मंदिर सोहाळेचे मायकल फर्नांडिस, सौ. निकम मॅडम, सौ. आजगेकर मॅडम तसेच शालेय विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून रोपलावणीच्या कामात सहभाग घेतला. उपस्थितांनी शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून घेत शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे अधोरेखित केले.
यानंतर हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत मौजे सोहाळेवाडी येथे सामाजिक वनीकरण विभाग, गडहिंग्लज व ग्रामपंचायत सोहाळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विविध प्रजातींची १,५०० रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
या वृक्षारोपण मोहिमेत सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामस्थ, विद्या मंदिर सोहाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत रोपांची लागवड केली. वृक्षलागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून, लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करून ते वृक्षात रूपांतरित करण्याची सामूहिक जबाबदारी असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" आणि "हरित महाराष्ट्र अभियान" या दोन्ही उपक्रमांमुळे कृषी, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग यांचा उत्कृष्ट संगम घडून आला. शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विविध शासकीय विभागांच्या संयुक्त सहभागातून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचा प्रभावी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; सोहाळे व सोहाळेवाडी येथे १,५०० रोपांचे वृक्षारोपण*
|