बातम्या

एका ध्येयवेड्या पर्यावरण आणि निसर्गप्रेमिशी साधलेला थेट संवाद*

Nisarg premmi


By nisha patil - 5/6/2026 4:19:56 PM
Share This News:



*एका ध्येयवेड्या पर्यावरण आणि निसर्गप्रेमिशी साधलेला थेट संवाद**

*आजरा(हसन तकीलदार)**:- आज जागतिक पर्यावरण दिन. या निमित्ताने ठिकठिकाणी झाडं लावतानाचे फोटो पोस्ट केले जातील, वृक्षारोपणाचे कार्यक्रम रंगतील. पण या सगळ्या पलीकडे जाऊन, वर्षाचे 365 दिवस निसर्गाची शांतपणे सेवा करणारे अनेक 'हिरवे हात' आपल्या अवतीभवती असतात. समाजात ते अनाम जीवन जगत असतात.अशाच एका ध्येयवेड्या पर्यावरणप्रेमींशी म्हणजेच सामाजिक कार्यकर्ते वृषाल आण्णा हुक्केरी यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.

         सकाळपासूनच पर्यावरण दिनाचे संदेश आणि शुभेच्छांचा पूर आला असताना, आजच्या या दिवसाकडे तुम्ही कसं बघता? असं आमच्या प्रतिनिधीनी विचारल्यावर ते अत्यंत सहजतेने म्हणाले, "माझ्यासाठी वर्षाचे 365 दिवस पर्यावरण दिन आहेत. आजच्या दिवशी या विषयावर चर्चा होते हे चांगलंच आहे,या दिवशी आपण किमान पर्यावरणाला आठवतो पण हा उत्साह फक्त आजच्या दिवसापुरता मर्यादित राहू नये, तो उद्याही टिकला पाहिजे.निसर्ग आणि पर्यावरणाशी आपली नाळ सतत जोडली गेली पाहिजे.

  त्यांच्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली, याबद्दल बोलताना ते भूतकाळात रमले. लहानपणापासूनच त्यांना झाडे -वेलींची, निसर्गाची, नद्या,झरे यांची आवड होती. पण जसजशी आपली शहरं सिमेंटची जंगलं बनू लागली, झाडे पक्षी दिसेनाशी झाली आणि उन्हाळ्याची दाहकता वाढत गेली ,थंड असलेला आपला गाव चटके देऊ लागला तेव्हा मनाला कुठेतरी हुरहूर लागली. नुसतं घरात बसून सरकारला किंवा व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा आपण स्वतः काय करू शकतो? आपण निसर्गासाठी काय करु शकतो?या विचारातून त्यांनी सुरुवात केली. अगदी घरातल्या ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्यापासून ते आपल्या परसबागेत एकेक झाड रुजवून ती फुलवण्यापर्यंत.पुढे ही आवड कधी एका ध्यासात बदलून गेली, हे त्यांचं त्यांनाच समजलं नाही.

या प्रवासात त्यांनी एक अत्यंत कौतुकास्पद आणि अनोखा पायंडा पाडला आहे. विविध कार्यक्रमांमध्ये, सण-समारंभांत किंवा वाढदिवसाला शुभेच्छा आणि अभिवादनासाठी दिल्या जाणाऱ्या महागड्या पुष्पगुच्छांना, हार-तुऱ्यांना त्यांनी पूर्णपणे फाटा दिला. त्याऐवजी समोरील व्यक्तीला विविध प्रकारच्या फळझाडांची किंवा देखण्या शोभिवंत फूलझाडांची जिवंत रोपं भेट देण्याची एक नवी आणि अनुकरणीय पद्धत त्यांनी सुरू केली. अनेक वर्षांपूर्वी सुरू केलेली ही अनोखी पद्धत त्यांनी आजही तेवढ्याच निष्ठेने चालू ठेवली आहे. यामुळे गुच्छांचा कचराच होत नाही, तर झाडांच्यामुळे माणसांच्या घरात आनंदाची हिरवळही रुजते, असा त्यांचा अनुभव आहे.

आजकाल लोक उत्साहाच्या भारात झाडं लावतात, पण त्या झाडांना जगवताना दिसत नाहीत, यावर बोलताना ते थोडे भावुक झाले. पोटतिडकीने म्हणाले, "झाड लावणं हे दोन मिनिटांचं काम आहे, पण ते जगवणं ही वर्षभराची जबाबदारी आहे. मूल जन्माला आल्यावर आपण त्याला तसंच रस्त्यावर सोडून देतो का? नाही ना. मग झाडांच्या बाबतीत असं का? फोटो काढण्यापुरती झाडं लावू नका. एकच झाड लावा, पण ते स्वतःच्या मुलासारखं मनापासून जगवून दाखवा."

सध्याच्या पिढीला काय संदेश द्याल, असं विचारल्यावर ते अत्यंत नम्रतेने म्हणाले, "मी संदेश देण्याइतका काही खूप मोठा माणूस नाही. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनीच समजून घेतली पाहिजे की, आपण निसर्गाकडून हवा, पाणी, जमीन सगळं काही भरभरून ओरबडून घेतलंय. आता ते निसर्गाला परत देण्याची वेळ आली आहे. सुरुवात खूप मोठी असायला हवी असं काही नाही. घराबाहेर पडताना प्लास्टिकची पिशवी नाकारणं, घरात पाण्याचा एकेक थेंब वाचवणं आणि दारात एक छोटंसं रोपटं लावणं, इथूनही आपण सुरुवात करू शकतो."

भविष्यात त्यांना विशेषतः लहान मुलांमध्ये ही निसर्गाची आवड निर्माण करायची आहे. कारण ही पिढी जर मातीशी, झाडांशी जोडली गेली, तर उद्याचं भविष्य नक्कीच हिरवंगार आणि निसर्गसंपन्न असेल, पुढच्या पिढीला आपण काय तरी ठेवा दिला पाहिजे यासाठी आता आपल्याल्या निसर्ग वाचवणं काळाची गरज वाटते.विकासाच्या नावावर लाखो, करोडो झाडांची कत्तल होताना बघावं लागतंय.हा लढा एका व्यक्तीचा नाही, तर आपल्या सगळ्यांचा आहे आणि आपण एकत्र आलो, सामूहिक प्रयत्न केले तर आपली वसुंधरा नक्कीच पुन्हा बहरेल, हा मोलाचा विचार त्यांनी या निमित्ताने मांडला.

     घरासमोर डौलदार उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला दाखवत ते म्हणाले,मातीत पेरलेलं हे एक छोटंसं आंब्याचं रोप आणि आज डोळ्यांसमोर फळांनी ओतंबून उभं असलेलं हे अवाढव्य वृक्ष. हा प्रवास केवळ एका रोपाचा नाही, तर त्यासोबत घेतलेल्या कष्टांचा आणि सोसलेल्या सुखाचा आहे. त्याला रोज प्रेमाने पाणी घालणं, ऊन, पाऊस, रोगापासून वाचवणं, एका लहान मुलासारखी होणारी त्याची वाढ डोळ्यांत साठवणं आणि आज अखेर त्याच्याच फांदीवर हिंदकोळे घेणारे हे रसाळ आंबे अनुभवणं. हे सुख खरोखरच शब्दांच्या पलीकडचं आणि अनमोल आहे.बाजारातून पैसे मोजून विकत आणलेले आंबे खाण्यात ती मजा कधीच नसते, जी आपण स्वतः हाताने लावलेल्या आणि जीवापाड जपलेल्या झाडाचं पहिलं फळ चाखण्यात असते. आज या झाडाकडे पाहताना निसर्गाचा एक मोठा नियम प्रकर्षाने जाणवतो की, या निसर्गाच्या पदरात आपण प्रेमाचा एक छोटासा कण जरी टाकला ना, तर तो आपल्याला कृतज्ञतेने भरभरून परत करत असतो...

    **झाडे लावा.. झाडे जगवा*

**आणि पर्यावरण वाचवा*


एका ध्येयवेड्या पर्यावरण आणि निसर्गप्रेमिशी साधलेला थेट संवाद*
Total Views: 518