बातम्या

नूल ता. गडहिंग्लज येथे शेतकरी-शेतमजुरांचा हुंकार*

Nul12


By nisha patil - 6/9/2026 3:14:58 PM
Share This News:



**नूल ता. गडहिंग्लज येथे शेतकरी-शेतमजुरांचा हुंकार*

**देवस्थान जमिनींच्या हक्कासाठी व बेकायदेशीर नोंदींविरोधात पेटवणार संघर्षाची मशाल*

 *आजरा(हसन तकीलदार*:-: देवस्थान व मठ ट्रस्टच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क मिळवून देणे, बेकायदेशीर नोंदींना आळा घालणे आणि शेतमालाला रास्त हमीभाव मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे या अगोदर आजऱ्यामध्ये मेळावा घेतला होता आता नूल (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित करण्यात आलेला 'संघर्ष व लढा मेळावा' अत्यंत उत्साहात संपन्न झाला. ६, ७ व ८ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर शहरात होणाऱ्या किसान सभेच्या २४ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाची पार्श्वभूमी आणि पुढील तीव्र आंदोलनाची दिशा या मेळाव्यात निश्चित करण्यात आली.  

        दिनकरराव शिंदे हॉल येथे पार पडलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन कायदेतज्ज्ञ व भाकपचे ज्येष्ठ नेते ॲड.दशरथ दळवी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. लक्ष्मण पाच्छापुरे होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना ॲड. दशरथ दळवी म्हणाले की, किसान सभेने नेहमीच शेतकरी, शेतमजूर आणि शोषितांच्या प्रश्नांवर ऐतिहासिक लढे उभारले आहेत. देवस्थान व मठ ट्रस्टच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या हक्कासाठी एकजूट दाखवत कायदेशीर व संघटनात्मक संघर्ष तीव्र करण्याचे आवाहन त्यांनी केले.

किसान सभेचे समन्वयक कॉ.संग्राम सावंत यांनी स्पष्ट केले की, देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क व कायदेशीर संरक्षण मिळेपर्यंत निकराचा लढा दिला जाईल. आगामी कोल्हापूर राज्य अधिवेशनासाठी आजरा व गडहिंग्लज तालुक्यातून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. किसान सभेचे कॉ. संभाजी मोहिते म्हणाले, संबंधित जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाची मांडणी केली आणि हक्क मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले. राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुका पातळीवरील संघटनात्मक तयारी, शेतकरी प्रश्नांची मांडणी आणि पुढील आंदोलनात्मक कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले.अखिल भारतीय किसान सभेचे आजरा तालुका नेते कॉ. शिवाजी गुरव यांनी तालुक्यातील शेतकरी शेतमजूर प्रश्नांची प्रत्यक्ष स्थिती मांडली आणि स्थानिक लढ्यांना संघटित स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली. शेतमजूर, कामगार व भूमिहीन बांधवांच्या प्रश्नांना शेतकरी चळवळीशी जोडून एकत्रित लढा उभारण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.

अध्यक्षीय भाषणात कॉ. लक्ष्मण पाच्छापुरे म्हणाले की, वाढता उत्पादन खर्च, शेतमालाला न मिळणारा भाव, निसर्गाची साथ न मिळणे आणि वाढते कर्ज यामुळे शेतकरी होरपळला आहे. या संकटांतून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीला नवी दिशा देण्याचे काम आगामी अधिवेशन करेल.

या मेळाव्यात प्रामुख्याने महत्त्वाचे ९ ठराव मंजूर करण्यात आले.

देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे '७-ब' तयार करण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यात लढा उभारणे, बेकायदेशीर डायरी व नोंदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी आंदोलन करणे, देवस्थान व मठ ट्रस्ट जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचे हक्क सुरक्षित करून अन्यायकारक बेदखली थांबवणे, शेतीमालाला 'उत्पादन खर्च अधिक रास्त नफा' या सूत्रानुसार हमीभाव देणे, संपूर्ण कर्जमुक्ती आणि पीक विम्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, सिंचन, वीज, पाणीवाटप व नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईचे प्रश्न तातडीने सोडवणे, शेतमजूर व भूमिहीनांसाठी गावठाणवाढ आणि रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवणे, कोल्हापुरातील २४ व्या राज्य अधिवेशनात गडहिंग्लज तालुक्यातून प्रचंड संख्येने सहभागी होणे, देवस्थान निर्मूलन कायदा कष्टकरी शेतकऱ्यांच्या बाजूने मजबूत करण्यासाठी राज्यव्यापी लढा उभारणे.

या मेळाव्यास संभाजी मोहिते, सविता पाटील, भगवान सूर्यवंशी, बसवंत कोरी, सुनील फुटाणे, छाया माने, भारता पाटील, शिवाजी कुराडे, शकुंतला माने, सुभाष नावलगी, भीमराव अस्वले, तानाजी यादव, अनिल शिंदे, संतोष चव्हाण, सुभाष शिंदे, रामचंद्र चव्हाण, भीमा पोवाडे, बाळू मांगले यांच्यासह गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नूल ता. गडहिंग्लज येथे शेतकरी-शेतमजुरांचा हुंकार*
Total Views: 211