बातम्या

उलट्या दिशेच्या वातावरणास महात्मा फुले यांचे विचारच सरळ करतील  ---     ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. शरद जावडेकर यांची स्पष्टोक्ती            

Only Mahatma Phules ideas can set right


By nisha patil - 10/8/2026 3:17:31 PM
Share This News:



उलट्या दिशेच्या वातावरणास महात्मा फुले यांचे विचारच सरळ करतील  ---     ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. शरद जावडेकर यांची स्पष्टोक्ती            

कोल्हापूर  :  राज्याचेच नव्हे तर देशाचे वातावरण सध्या उलट्या दिशेने चालले आहे या वातावरणात सद्यस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचारच सरळ करतील एवढी ताकद त्यांच्या विचारात आहे अशी स्पष्टोक्ती  ज्येष्ठ विचारवंत आणि अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ . शरद जावडेकर यांनी दिली .

तर भारतीय शिक्षण मंडळ आणि अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्ष सोहळ्यानिमित्त आयोजित कोरगांवकर हायस्कूल येथील कार्यशाळेत महात्मा फुले यांच्या विचारांची कालसापेक्षता या विषयावरती प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते . अध्यक्षस्थानी अखिल भारतीय शिक्षण हक्क सभेचे अध्यक्ष प्रा .रमेश पाटील होते .    डॉ. शरद जावडेकर पुढे म्हणाले की महात्मा फुले केवळ शिक्षणतज्ञ नव्हते तर शैक्षणिक अर्थशास्त्रज्ञ आणि कृषितज्ञ होते तसेच ते सामाजिक नाटककार होते. ते भारताचे मार्टिन ल्युथर किंग आणि गौतम बुद्धानंतर तार्किक विचार मांडणारे द्रष्टे चिकित्सक होते . कार्ल मार्क्स आणि महात्मा फुले यांच्या विचारात अनेक बाबतीत साधर्म्य असले तरी महात्मा फुले यांचे विचार सत्यशोधकी आणि क्रांतिकारी होते . डॉ. जावडेकर यांनी महात्मा फुले यांच्या साहित्य, कृषि, शिक्षण, अर्थकारण या सर्व बाबींवर प्रकाशझोत टाकला . माणसांना मालिकेत आणि त्यातल्या धार्मिकतेत गुंतवून टाकण्याचा सोयिस्कर आणि श्रेयस्कर प्रकार जाणिवपूर्वक सुरु असून विवेकहिन बनवून मानसिक गुलामगिरी पुन्हा निर्माण होण्याची भिती व्यक्त केली .

महिला खासदार फुले वाड्यातील वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात हे कशाचे द्योतक आहे असा सवाल देखील शासकीय व्यवस्थेला त्यांनी विचारला . उच्चवर्णियांना महात्मा फुले यांचा विसर पडला असला आणि बहुजनांना ब्राम्हण बनण्याची घाई असली तरी  २०० वर्षानंतर फुलेंच्या विचारांची चिकित्सा करावयास मिळणे यातच या महात्म्याचा गौरव आहे . शिक्षणावर प्रेम असणाऱ्या आणि संघटना म्हणून पुढे असणाऱ्या कोणत्याही शिक्षक संघटनेने प्रथमदर्शी जंतरमंतर वरील जेन झी ला पाठिंबा दिला नव्हता याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले .

ज्योतिष, कर्मकांड, धर्म, परंपरा यांचा गदारोळ आपणास विवेकहिन करण्यास पुरेसा आहे असेही त्यांनी सांगितले . प्रा. रमेश पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात महात्मा फुले यांचे साहित्य वाचून वैचारिक समृद्धता वाढवा असे आवाहन केले . आंतरभारतीचे माजी सचिव एम.एस. पाटोळे यांनी या कार्यशाळेचा उद्देश सांगतानाच शिक्षण आणि मानवतेचा प्रसार करणाऱ्या महात्मा फुले यांचा विचार प्रत्येकांनी अंगिकारल्यास जातीचे उच्चाटन होईल असे सांगून आंतरभारतीच्या प्रत्येक ज्ञानशाखेत या विचाराचे उपक्रमाद्वारे उन्नयन होईल असे सांगितले .

प्रारंभी राष्ट्रसेवादलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भरत लाटकर, पद्मश्री डॉ.डी.वाय. पाटील आणि आंतरभारती शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा पल्लवीताई कोरगांवकर यांच्या मातोश्रींप्रती श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .सचिव भरत अलगौडर यांनी प्रास्ताविक केले . माजी सचिव एम . एस. पाटोळे आणि प्राथमिक विभागाच्या सचिव संध्या वाणी यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . इंद्रायणी पाटील यांच्या गीतमंच विभागाने आणि पर्यवेक्षिका सरिता शिंदे यांनी गायलेल्या प्रार्थनेने कार्यशाळेस सुरुवात झाली . तृप्ती रावराणे यांनी सूत्रसंचालन केले . संध्या वाणी यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी संचालक हसन देसाई, नेहा कानकेकर, राष्ट्रसेवादल संघटक हणमंत देसाई, उर्मिला पोवार,मुख्याध्यापक संजय सौंदलगे, सुरेखा पोवार, रणधीर मिरजकर, रंगराव कांदळकर, मारुती शिणगारे, राजाराम संकपाळ तसेच कौलव, कंथेवाडी, निगवे खालसा येथील आंतरभारती विचारप्रेमी तसेच सर्व शाखांतील शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते .


उलट्या दिशेच्या वातावरणास महात्मा फुले यांचे विचारच सरळ करतील  ---     ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. शरद जावडेकर यांची स्पष्टोक्ती            
Total Views: 6