बातम्या
जातीपातीचे राजकारण नव्हे, सर्व समाजातील दिव्यांगांच्या हक्कांसाठी आमचा संघर्ष – आमदार बच्चू (भाऊ) कडू
By nisha patil - 3/8/2026 9:55:25 PM
Share This News:
जातीपातीचे राजकारण नव्हे, सर्व समाजातील दिव्यांगांच्या हक्कांसाठी आमचा संघर्ष – आमदार बच्चू (भाऊ) कडू
तारा न्युज प्रतिनिधी अजित बोडके समाजामध्ये जातीपातीचे राजकारण करणारे अनेक लोक आहेत. मात्र आम्ही कोणत्याही एका समाजासाठी नव्हे, तर सर्व समाजातील दिव्यांग, वंचित आणि गरजू नागरिकांच्या हक्कांसाठी व न्यायासाठी विचारांची लढाई लढत आहोत, असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा आमदार बच्चू (भाऊ) कडू यांनी केले.
तारदाळ येथे आयोजित शिव-भीम महोत्सव २०२६ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी विविध समाजातील नागरिक, प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.
आपल्या भाषणात आ. कडू यांनी समाजातील वंचित, दिव्यांग आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांबाबत शासनाने अधिक संवेदनशील भूमिका घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली. समाजात जात, धर्म आणि पंथ यांच्या नावावर मतभेद निर्माण करण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर काम करणे ही आजची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांगांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी प्रहार संघटना सातत्याने संघर्ष करत असून हा लढा भविष्यातही अधिक जोमाने सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
युवकांनी सामाजिक सलोखा जपत अन्यायाविरुद्ध एकत्र उभे राहावे, तसेच समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय व संधी मिळवून देण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. शिव-भीम महोत्सवासारखे उपक्रम समाजामध्ये समता, बंधुता आणि सामाजिक एकात्मता दृढ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, महेश बडे, समाधान हेगडकर, सुनिल शिंदे, शहाबुद्दीन गुड्डूभाई, नारायण हुपरीकर, प्रल्हाद माने, राजू टिळगे, नजीर नदाफ, प्रकाश कांबळे, दगडू कांबळे, सिद्धार्थ गायकवाड, नवनाथ गायकवाड, गणेश गायकवाड, बाळू कराळे यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध समाजातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपती शिंदे यांनी केले, तर सचिन पोवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड यांनी केले होते.
जातीपातीचे राजकारण नव्हे, सर्व समाजातील दिव्यांगांच्या हक्कांसाठी आमचा संघर्ष – आमदार बच्चू (भाऊ) कडू
|