बातम्या

दत्तवाड येथे हयात दाखला शिबिरास उदंड प्रतिसाद; १६७ लाभार्थ्यांची गैरसोय टळली

Overwhelming response to the Proof of Existence


By nisha patil - 8/31/2026 1:37:11 PM
Share This News:



दत्तवाड येथे हयात दाखला शिबिरास उदंड प्रतिसाद; १६७ लाभार्थ्यांची गैरसोय टळली

शासकीय सुट्टीच्या दिवशीही प्रशासनाची लोकसेवा; पेन्शनधारकांनी व्यक्त केले समाधान

दत्तवाड प्रतिनिधी : आचिन हेरवाडे शिरोळ तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागामार्फत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, विधवा पेन्शन, दिव्यांग पेन्शन तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व पेन्शनधारकांसाठी दरवर्षी हयात दाखला सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा दाखला वेळेत सादर न केल्यास पेन्शन बंद होण्याची शक्यता असल्याने, यापूर्वी लाभार्थ्यांना पडताळणीसाठी शिरोळ तहसीलदार कार्यालयात वारंवार जावे लागत होते.

लाभार्थ्यांची ही गैरसोय व होणारी हेळसांड टाळण्यासाठी शिरोळ प्रशासनाने आता थेट गावागावांत जाऊन हयात दाखले काढणे व त्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रशासनाच्या या लोकाभिमुख निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या उपक्रमांतर्गत दानोळी, कोथळी, घालवाड, कुटवाड, शिरटी-हसूर तसेच अर्जुनवाड येथील लाभार्थ्यांनी यापूर्वीच या सुविधेचा लाभ घेतला आहे. याच मालिकेतील पुढील टप्प्यात रविवारी, शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही, दत्तवाड येथे विशेष हयात दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दत्तवाडमध्ये प्रशासनाने थेट गावातच हयात दाखल्यांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, दिव्यांग तसेच इतर पेन्शनधारकांची मोठी गैरसोय टळली. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांमधून समाधानाचे वातावरण व्यक्त करण्यात आले.

शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिरामध्ये तब्बल १६७ लाभार्थ्यांनी आपल्या हयात दाखल्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ओंकार मुंजारे, शुभम पाटोळे, विनायक चुडमंगे, दिपाली चुडमंगे, मनिषा जाधव, दिपाली मुगळे तसेच दत्तवाड महसूल अधिकारी कार्यालयातील कर्मचारी चिक्कू बिरणगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान,आमचे प्रातिनिधी श्री. आचिन हेरवाडे यांनी शिबिरास भेट देऊन प्रशासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे कौतुक केले.

दरम्यान, या विशेष शिबिर मालिकेचा पुढील टप्पा म्हणून सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी घोसरवाड येथे विशेष हयात दाखला कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. घोसरवाड व परिसरातील पात्र पेन्शनधारकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गावातच मिळालेली शासकीय सेवा, प्रशासनाचा लोकाभिमुख निर्णय आणि एका दिवसात १६७ लाभार्थ्यांची झालेली नोंदणी यामुळे दत्तवाड येथील हे शिबिर विशेष यशस्वी ठरले आहे.


दत्तवाड येथे हयात दाखला शिबिरास उदंड प्रतिसाद; १६७ लाभार्थ्यांची गैरसोय टळली
Total Views: 25