बातम्या

पंचायत समितीची मासिक सभा संपन्न

Panchayat Samiti monthly meeting concludes


By nisha patil - 8/14/2026 8:59:41 PM
Share This News:



*पंचायत समितीची मासिक सभा संपन्न

*ग्रामपंचायतिकडील शासनाच्या पाणीपट्टी कर वाढीला तिव्र विरोध

*सभेला अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत देसाई यांनी व्यक्त केली नाराजी

*आजरा(हसन तकीलदार):-पंचायत समितीच्या सभागृहामध्ये मासिक सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार होत्या. सभेच्या सुरवातीस पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कृषी अधिकारी दिनेश शेटे यांनी स्वागत केले.
       

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता एम. व्ही. तिवले यांनी विभागाचा अहवाल सादर केला. प्रती महिन्याला एका नळजोडणीला किमान 150 ते 400 रुपये अशी पाणीपट्टी वाढ करण्याचा शासन निर्णय झाला असल्याचे सांगितले त्यामुळे वार्षिक किमान 1800 ते कमाल 4880 रुपये इतकी अधिकची पाणीपट्टी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा शासन निर्णय तालुक्यातील ग्रामपंचायतीना कळवण्यात आला आहे. योजनेचे बिल, पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा पगार, किरकोळ दुरुस्ती या खर्चावर आधारित ही वाढ करण्यात आली असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. तेव्हा जिल्हा परिषद सदस्य सुधीरभाऊ देसाई यांनी या निर्णयाला पंचायत सदस्यांचा विरोध असल्याचे जिल्हा परिषद व शासनाला कळवावे असे सांगितले. त्याचप्रमाणे काही विभाग प्रमुख मासिक सभेला उपस्थित रहात नाहीत त्यांच्या सवडीप्रमाणे आणि मर्जीप्रमाणे सभा घ्यायच्या काय? असा संतप्त सवाल देसाई यांनी उपस्थित केला. यावर गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी संबंधिताना नोटीसा पाठवणार असल्याचे सांगितले. मलिग्रे आणि कानोली रस्त्याची दुरावस्था झाल्याचे सुधीरभाऊ देसाई यांनी सांगितले.
   

पाणी पट्टीला विरोध करताना विकास चोथे म्हणाले की, याबाबत ग्रामपंचायतींचा अभिप्राय घ्यावा. तसेच सभागृह सुरु होऊन सहा महिने लोटले तरीसुद्धा शेतकऱ्यांना कोळपे, ताडपत्री, विळे, औषधे, बियाणे कधी मिळणार? असा सवाल चोथे यांनी उपस्थित केला.
 

पाणी पट्टी कर वाढीवर बोलताना समीर पारदे म्हणाले की, मलिग्रे ग्रामपंचायतीमध्ये वार्षिक केवळ 200 रुपये पाणीपट्टी वाढ केली तर ग्रामस्थ आंदोलनाला रस्त्यावर उतरले त्यामुळे ही एव्हढी पाणीपट्टी वाढ केली तर जनता गप्प बसणार नाही असे सांगितले.
   

 पशुसंवर्धन विभागाचे सहाय्य्क उपायुक्त डॉ. पी. सी.मुतेफोड यांनी पशुविमा योजनेबाबत माहिती दिली. ही योजना लवकरच कार्यन्वयित होणार असल्याचे सांगितले. आजरा परीक्षेत्र वनअधिकारी सचिन सावंत यांनी घाटकरवाडी येथील हत्तीग्रामला 90 कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे अंगणवाड्याना वीज, पाणी, शौचालय व पोषण आहारासाठी कढई उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. कृषी, शिक्षण, वीज, बांधकाम याबरोबरच विविध विषयावर चर्चा करण्यात आली.


पंचायत समितीची मासिक सभा संपन्न
Total Views: 19