बातम्या
पेंढारवाडी ग्रामपंचायतीसमोर पाण्यासाठी उपोषण
By nisha patil - 4/14/2026 4:53:48 PM
Share This News:
**पेंढारवाडी ग्रामपंचायतीसमोर पाण्यासाठी उपोषण*
**डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिवशीच उपोषण परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने साधी दखलसुद्धा घेतली नाही हा लोकशाही आणि घटनेचा अवमान आहे -कॉ. शिवाजी गुरव*
**आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा तालुक्यातील मौजे पेंढारवाडी गावातील प्रभाकर मारुती आजगेकर यांनी पेंढारवाडी गावातील माळवाडी येथील गट क्र. 144 मधील शेतातील घरासाठी नवीन नळ पाणी कनेक्शनची मागणी केली होती. जलजीवन मिशन अंतर्गत मुख्य पाईपलाईन पासून सदरचे घर जास्त अंतरावर व रस्त्याच्या पलीकडे असल्याने नवीन नळपाणी जोडणीसाठी स्वतंत्र पाईप लाईन टाकून देणे गरजेचे असल्याचे प्रभाकर आजगेकर यांचे म्हणणे आहे.
या घरामध्ये आपली जनावरे व संपूर्ण कुटुंब राहणार असल्याने शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नवीन नळ कनेक्शन मिळावे नाहीतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी म्हणजेच 14 एप्रिल 2026 पासून ग्रामपंचायत कार्यालय पेंढारवाडी समोर धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन दि. 6/4/2026 रोजी दिले होते. त्यानुसार आजगेकर हे आज सकाळी धरणे आंदोलनासाठी बसले आहेत. सकाळी ग्रामसेवक आंबेडकर जयंती साजरी करण्यास आले. जयंती साजरी केली परंतु त्यांच्या आंदोलनाची दखल न घेता कार्यालयाला कुलूप लावून तसेच निघून गेले असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
जवळ जवळ 40 लाखाची ही पाणीपुरवठा योजना आहे. तरीसुद्धा गावातील काही घरांना नवीन नळ कनेक्शन जोडलेले नाहीत नवी आणि जुनी पाईप लाईन जोडून काम केले असल्याचा आरोप करण्यात येत असून याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही होत असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी कॉ. शिवाजी गुरव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, पेंढारवाडी ग्रामपंचातीच्या कार्यालयासमोर हर घर जल योजनेतून हक्काचे पाणी मिळावे यासाठी पाईपलाईन बसवण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे.
मात्र आंदोलन सुरु असतानादेखील ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लागले आहे. ग्रामपंचायत ग्रामसेवक अथवा कोणीही कर्मचारी उपस्थित नाहीत हा देशाच्या घटनेचा व आंदोलनकर्त्यांचा अवमान आहे. आज भारतरत्न,घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. ज्यांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली आणि त्याच दिवशी लोकशाही राज्यामध्ये आपल्या हक्कासाठी संविधानिक पद्धतीने लढा देणाऱ्या आंदोलन कर्त्याला दुर्लक्षित करणे म्हणजे हा लोकशाही आणि राज्यघटनेचा अवमान आहे अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित ग्रामसेवक यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
पेंढारवाडी ग्रामपंचायतीसमोर पाण्यासाठी उपोषण
|