बातम्या
दत्तवाडमध्ये गणेश मंडळांची पोलिसांकडून बैठक
By nisha patil - 1/9/2026 10:55:14 PM
Share This News:
दत्तवाडमध्ये गणेश मंडळांची पोलिसांकडून बैठक
डीजेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई; सीसीटीव्ही बसविणाऱ्यांचा पोलिसांकडून प्रमाणपत्र देऊन सन्मान...
दत्तवाड प्रातिनिधि..आचिन हेरवाडे....... आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दत्तवाड येथील गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (दि. १) दे. भ. रत्नाप्पा कुंभार सभागृहात कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या वतीने घेण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गणेशोत्सव काळातील कायदा व सुव्यवस्था, डीजे व ध्वनिप्रदूषण, सीसीटीव्ही व्यवस्था तसेच अवैध धंदे व नशेविरोधात विविध सूचना करण्यात आल्या.
डीजे व साऊंड सिस्टीमचा वापर करताना ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर किंवा संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा डोईजड यांनी दिला. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले व सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. डीजेबाबत तक्रार प्राप्त झाल्यास नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गणेश मंडळांनी उत्सवाच्या निधीतून काही रक्कम सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी खर्च करावी, असे आवाहन डोईजड यांनी केले. तसेच वैयक्तिक पातळीवर सीसीटीव्ही बसविणारे नागरिक किंवा गणेश मंडळांच्या माध्यमातून सीसीटीव्ही बसविणाऱ्या मंडळांना कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
अवैध धंदे, नशेविरोधात गोपनीय माहिती द्या
यावेळी गुरुदत्त शुगर्सचे संचालक बबन चौगुले यांनी गावातील नशेचे प्रकार व अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर डोईजड यांनी अवैध धंदे किंवा नशेचे प्रकार सुरू असल्यास नागरिकांनी पोलिसांना गोपनीय माहिती द्यावी; माहितीच्या आधारे आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
गणेशोत्सव काळात तरुणांनी शिस्त पाळावी, नागरिकांना त्रास होणार नाही याची मंडळांनी दक्षता घ्यावी आणि उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
बैठकीस पोलिस अधिकारी नितीन साबळे, बबन चौगुले, बी. वाय. शिंदे, पोलिस पाटील संजय पाटील, शबीर नाईकवाडे, बाबुराव पोवार, लालासाहेब मांजरेकर, संजय माने, राज गोंडा पाटील, विवेक चौगुले, सुरज शिंगे, सचिन हेमगीरे, अमित माने, सोनू सिदनाळे, नितीन पोवार, अजित सिदनाळे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.सुरेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर संजय पाटील यांनी आभार मानले.
दत्तवाडमध्ये गणेश मंडळांची पोलिसांकडून बैठक
|