बातम्या
*वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्तुत्य उपक्रम
By nisha patil - 8/20/2026 8:58:48 PM
Share This News:
*कॅन्सरविरोधी लढ्याला वाटंगीतून बळ; 67 नागरिकांची तपासणी
*वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्तुत्य उपक्रम
*आजरा(हसन तकीलदार): “कॅन्सरची भीती नको, वेळेत तपासणी हवी” या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देत प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी येथे विशेष कॅन्सर तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच कॅन्सर तपासणीची सुविधा उपलब्ध करून देत एकूण 67 नागरिकांची तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन माजी सभापती अल्बर्ट डिसोजा, आजरा कारखाना संचालक शिवाजी नांदवडेकर सर, माजी सरपंच बाळू पोवार व माजी सरपंच सौ. इंदुबाई कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.कार्यक्रमाची प्रस्तावना महेश कोळेकर यांनी केली.
यावेळी अल्बर्ट डिसोजा यांनी मनोगत व्यक्त करताना कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि आरोग्याबाबत जागरूक राहावे, त्याचप्रमाणे आपले आरोग्य सांभाळावे असे आवाहन केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांनी कॅन्सरबाबत सविस्तर माहिती देताना कॅन्सरची प्राथमिक लक्षणे, जोखमीचे घटक, प्रतिबंधात्मक उपाय तसेच कॅन्सरचे लवकर निदान होण्याचे महत्त्व याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. संशयित लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता पुढील तपासणी व उपचारासाठी संदर्भ सेवा घेण्याचे त्यांनी सांगितले.
शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जीवन पाटील व दंतचिकित्सक डॉ. गोकुळ जाधव यांनी नागरिकांची तपासणी केली. मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग तसेच गर्भाशयाचा कर्करोग याबाबत आवश्यक तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे, आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे आणि नियमित तपासणी करणे याबाबतही जनजागृती करण्यात आली.
शिबिराच्या नियोजन व यशस्वी आयोजनासाठी आरोग्य निरीक्षक अतुल पाथरवट, आरोग्य सहाय्यक जे. एच. साबखान, आरोग्य सहाय्यिका सौ. गीतांजली सुतार व सौ. रंजना गावडे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगीचे सर्व अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामीण भागातील नागरिकांना कॅन्सर तपासणीची सुविधा जवळच उपलब्ध करून देत लवकर निदान, योग्य मार्गदर्शन आणि वेळेवर उपचाराचा संदेश देणारे हे शिबिर आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले.आभार रत्नदीप पारधे यांनी मानले.
*वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्तुत्य उपक्रम
|