बातम्या
प्राथमिक शाळा म्हणजे संस्कार केंद्र– अंजनाताई रेडेकर
By nisha patil - 7/21/2026 7:48:25 PM
Share This News:
प्राथमिक शाळा म्हणजे संस्कार केंद्र– अंजनाताई रेडेकर
आपल्या गावातील प्राथमिक शाळा या संस्कार केंद्रे असून त्यांचे जतन व संवर्धन आपण सर्वांनीच केले पाहिजे व ती आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केंद्रारी रेडेकर समूहाच्या प्रमुख श्रीमती अंजना रेडेकर यांनी केले. त्या वाटंगी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.
राज्याचे माजी गृहमंत्री व विधानपरिषद विरोधी पक्षनेते मा. सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जमा झालेल्या वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती रेडेकर मॅडम उपस्थित होत्या.
सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील कामत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. श्रीमती रेडेकर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत प्राथमिक शाळा ह्याच खऱ्या संस्कारांची केंद्रे असून आई-वडिलांनंतर संस्कारांची प्रमुख जबाबदारी ही शिक्षकांवर येते. शिक्षकांनी केलेल्या संस्कारांमुळे समाजाची जडणघडण होत असते; समाजाचा पाया मजबूत होत असतो.
त्यामुळे प्राथमिक शाळा टिकवण्यासाठी सर्वांनीच सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडू नयेत यासाठी आम्ही शाळा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत.
सरकारने शिक्षणांना अनेक अशैक्षणिक कामे लावली आहेत. त्याचा परिणाम शाळांच्या गुणवत्तेवर होत असून ही अशैक्षणिक कामे कमी केली पाहिजेत. तसेच शून्य पटाच्या अंगणवाडी शाळेतील स्टाफ प्राथमिक शाळेला जोडल्यास त्याचा फायदा शाळेला होईल. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. इंदुबाई कुंभार होत्या. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते तसेच शिवराज समुहाचे प्रमुख श्री. शिवाजी गिलबिले सर, विठ्ठल भिकले, मधुकर चौगुले, बाळू चौगुले, पर्वता नाईक, देऊळवाडीचे उपसरपंच संजय भाई सावंत, हरिश्चंद्र व्हरकटे, महादेव गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. पप्पू उर्फ अर्जुन कसलकर यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
श्रीमती रंजना हसुरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
प्राथमिक शाळा म्हणजे संस्कार केंद्र– अंजनाताई रेडेकर
|