बातम्या

गणेशोत्सवात विद्युत सुरक्षेला प्राधान्य द्या - महावितरणचे आवाहन

Prioritize electrical safety during Ganeshotsav


By nisha patil - 9/9/2026 10:46:06 PM
Share This News:



गणेशोत्सवात विद्युत सुरक्षेला प्राधान्य द्या - महावितरणचे आवाहन

कोल्हापूर/सांगली 09 सप्टेंबर 2026: राज्याच्या सांस्कृतिक परंपरेत लोकप्रिय सार्वजनिक गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय गत वर्षीपासून शासनाने घेतला आहे. हा राज्यमहोत्सव सुरक्षितपणे साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशमंडळांनी विद्युत सुरक्षेबाबत दक्षता बाळगावी. उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळे, घरगुती गणपती मंडप, दुकाने आणि परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. त्यात विद्युत सुरक्षेकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी मंडळांनी व नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

गणेशोत्सव काळात मंडपांमध्ये विद्युत दिव्यांची माळ, झगमगती रोषणाई, ध्वनिक्षेपक, पंखे तसेच अन्य विद्युत उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे विद्युत यंत्रणेवर अतिरिक्त भार येण्याची शक्यता असते. योग्य क्षमतेच्या विद्युत वाहिन्या, प्लग, सॉकेट आणि संरक्षक उपकरणांचा वापर करून विद्युत जोडणी सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. 

मंडप उभारताना विद्युत सुरक्षेची काळजी
उत्सव मंडप उभारताना जवळून जाणाऱ्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखावे. मंडप, कमानी, ध्वज, पताका, सजावटीचे साहित्य किंवा लोखंडी संरचना वीजवाहिन्यांना स्पर्श होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. विद्युत खांब, रोहित्रे किंवा इतर विद्युत यंत्रणेला मंडपाची सजावट बांधू नये.

अनधिकृत वीजजोडणी टाळा
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार सार्वजनिक धार्मिक उत्सवासाठी तात्पुरत्या वीजजोडणीसाठी महावितरणकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्यात येतो. सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची मंडप परवानगी, पोलिस स्थानकाचा परवाना, विद्युत निरिक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज जोडणी मागणी अर्ज, वीजसंच मांडणीचा चाचणी अहवाल व राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुकाची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

     गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज सादर करावा किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. तेंव्हा उत्सव मंडळांनी विद्युत जोडणीसाठी अधिकृत पद्धतीनेच वीजपुरवठा घ्यावा. अनधिकृतपणे वीजजोडणी करणे अत्यंत धोकादायक असून त्यामुळे जीवित व वित्तहानी होऊ शकते. तात्पुरत्या वीजजोडणीसाठी अधिकृत प्रक्रिया पूर्ण करूनच वीजपुरवठा घ्यावा. 

ओव्हरलोडिंगपासून सावधान
एकाच सॉकेटवर अनेक विद्युत उपकरणे जोडू नयेत. क्षमतेपेक्षा जास्त विद्युत भार वापरल्यास वायर तापणे, शॉर्टसर्किट होणे किंवा आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. खराब, तुटलेल्या किंवा उघड्या तारांचा वापर करू नये. दर्जेदार व मानांकन प्राप्त विद्युत उपकरणे आणि वायरिंग साहित्य वापरावे.

पावसाळ्यात विशेष दक्षता
गणेशोत्सव काळात पावसाची शक्यता लक्षात घेता विद्युत जोडण्या, प्लग, सॉकेट आणि उपकरणे पाण्यापासून सुरक्षित ठेवावीत. पाणी साचलेल्या ठिकाणी विद्युत उपकरणे ठेवू नयेत. ओल्या हाताने विद्युत उपकरणांना स्पर्श करू नये.

विद्युत यंत्रणेला स्वतः हात लावू नका
वीजपुरवठ्यात बिघाड झाल्यास स्वतः दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू नये. फ्यूज, मीटर, वीजवाहिनी किंवा विद्युत यंत्रणेत अनधिकृत फेरफार करू नये. आवश्यक दुरुस्ती अधिकृत व प्रशिक्षित व्यक्तीकडूनच करून घ्यावी.

मिरवणुकीतही काळजी घ्या
गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान सजावटीचे साहित्य, ध्वज, लोखंडी रॉड किंवा अन्य वस्तू वीजवाहिन्यांच्या संपर्कात येणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी. वीजवाहिन्यांजवळ सेल्फी, फटाके किंवा इतर धोकादायक प्रकार टाळावेत. सण-उत्सव आनंदाचे, श्रद्धेचे आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहेत. हा आनंद सुरक्षित आणि अपघातमुक्त राहण्यासाठी नागरिक, उत्सव मंडळे आणि आयोजकांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

आपात्कालीन संपर्क क्रमांक
आपात्कालीन स्थितीत जिल्हास्तरीय नियंत्रण कोल्हापूर (7875769103) व सांगली (7875769449) कक्षाशी संपर्क साधावा. मंडळ कार्यकर्त्यांनी संबंधित कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे टोल फ्री क्रमांक 1912 /19120/ 1800-212-3435 / 1800-233-3435 हे ग्राहकांच्या सेवेत 24 तास उपलब्ध आहेत.


गणेशोत्सवात विद्युत सुरक्षेला प्राधान्य द्या - महावितरणचे आवाहन
Total Views: 29