बातम्या
खेळाडूंसाठी मानसशास्त्र आणि नैतिकता अत्यंत महत्वाचे - क्रीडा आहारतज्ज्ञ अवंती दामले
By nisha patil - 7/18/2026 10:34:03 PM
Share This News:
खेळाडूंसाठी मानसशास्त्र आणि नैतिकता अत्यंत महत्वाचे - क्रीडा आहारतज्ज्ञ अवंती दामले
कोल्हापूर, दि.१८ जुलै - खेळाडूंनी जागरूक राहून मानसशास्त्र आणि नैतिकता या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन क्रीडा आहारतज्ज्ञ अवंती दामले यांनी आज येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागामार्फत राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात 'क्रीडा मानसशास्त्र, क्रीडा पोषण आणि डोपिंग' या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी क्रीडा आहारतज्ज्ञ दामले मार्गदर्शन करीत होत्या. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजनीश कामत उपस्थित होते. प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांची विशेष उपस्थिती होती.
क्रीडा आहारतज्ज्ञ दामले म्हणाल्या, आपल्या देशाला जागतिक स्तरावर मान्यता मिळण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहित करणे महत्वाचे आहे. येणार पुढील काळ हा खेळासाठी आणि खेळाडूंसाठी अत्यंत पोषक आहे. देशाला पुढे घेवून जाण्यासाठी खेळाडूंनी स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक आहे. अन्न हे आपले पोषक घटक आहे. परंतू, आपण त्याला फारसे महत्व देत नाही. फक्त आपल्या जिभेचा विचार करतो, आरोग्याचा विचार करीत नाही. खेळाडूंनी याच गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे आहे. आपला आहार आपल्या खेळास सहायय करणारा असणे गरजेचे असते. सामना असो वा नसो खेळातील गुणवत्ता उंचावण्यासाठी सातत्याने सराव करणे आवश्यक आहे. शरीराची झिज भरून काढण्यासाठी झोप महत्वाची आहे. त्याचबरोबर, स्मार्टफोनवर लगाम ठेवणेही गरजेचे आहे. उत्कृष्ट खेळाडू घडण्यासाठी अनुशासन, निष्ठा आणि समर्पण अत्यंत महत्वाचे आहे. डाळी, कडधान्य, भरडधान्य, मध, दूध, गूळ, बटाटा यामध्ये कार्बोहायड्रेडस् मोठया प्रमाणात मिळतात. त्याचा आहारामध्ये निश्चित समावेश करावा. दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे महत्वाचे असते. जे पदार्थ हृदय, किडनी आणि हाडांवर दुष्परिणाम करतात आणि ज्या पदार्थांवर बंदी आहे त्यापासून खेळाडूंनी दूर राहिलेे पाहिजे. आपण अविचाराने कृती करणार नाही हे निश्चित केले पाहिजे.
फिजिओथेरपिस्ट व सल्लागार डॉ.यशवंत वेलणकर म्हणाले, खेळात यश प्राप्त करण्यासाठी खेळाडूंची मानसिक आणि भावनिक तयारी अत्यंत महत्वाची असते. खेळाच्या मैदानावर अन्य कारणांमुळे मानसिकता खराब झाली असेत तर ती त्वरित स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी आवश्यक असणाऱ्या काही सोप्या व्यायाम प्रकाराचा सराव करावा. कामगिरीवर परिणाम करणाऱ्या घटकांकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करावे. स्नायू बळकट करण्यासाठी जशी मेहनत घेतो तशीच मेहनत बुध्दीचा विकास करण्यासाठी घ्यावी. आपले लक्ष फक्त खेळाकडेच असले पाहिजे. प्रत्येक खेळाडूने लक्ष केंद्रीत करण्याचे कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. सर्व खेळांमध्ये क्रीडा मानसशास्त्र खूप महत्वाचे मानले जाते. कारण, खेळाडूंना जिंकू देणारे, जिंकण्याचा विचार करण्यास प्रेरित करणारे महत्वाचे मेंदू असते. यामुळे, स्वयंप्रेरणा अथवा स्वयंसूचना देऊन खालावलेली कामगिरी उंचावणे शक्य होते. जे खेळाडू अपयश पचवू शकतात तेच खेळाडू मोठे होतात. डोपिंगचे दुष्परिणाम दीर्घकालीन असतात. खेळ बाजूलाच राहते आणि मनुष्य सामान्य आयुष्य सुध्दा जगू शकत नाही. म्हणूनच, खेळाडूंनी एकाग्रता वाढविण्याचे कौशल्ये आत्मसात करावीत.
याप्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य सिध्दार्थ शिंदे म्हणाले, खेळाचे मानसशास्त्र खेळाडूंना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास आणि आत्मविश्वासाने खेळण्यास मदत करते. खेळामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. खेळाचे मानसशास्त्र खेळाडूंना त्यांच्या चुकांमधून शिकण्यास आणि सुधारणा करण्यास मदत करते. ज्यामुळे ते सातत्याने चांगले प्रदर्शन करू शकतात.
अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना कुलगुरू डॉ.राजनीश कामत म्हणाले, खेळाडूंची मानसिकता उत्तम राहण्यासाठी पोषण आणि पोषणमूल्य महत्वाचे आहेत. गैरप्रकाराने यश मिळविणे हे चुकीचे आहे. खेळताना खेळाडूंचे लक्ष विचलित हाऊ नये यासाठी एकाग्रता आवश्यक असते. खेळाचे मानसशास्त्र खेळाडूंना त्यांचे ध्येय निश्चित करून त्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. खेळताना अनेक प्रकारच्या भावना निर्माण होतात या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असतेे. यामुळे खेळाडूंना त्यांच्यातील नेतृत्व क्षमता विकसित करण्यास मदत होतेे, जेणेकरून ते आपल्या संघाला योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतील.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ.शरद बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.एन.डी.पाटील आणि अजय मराठे यांनी केले तर डॉ.किरण पाटील यांनी आभार मानले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांचेसह क्रीडा प्रशिक्षक सविता भोसले, डॉ.अतुल टोने, डॉ.कृष्णात पाटील, डॉ.सुजित नाईक, डॉ.आकाश बनसोडे, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.धनंजय पाटील, डॉ.रामचंद्र पाटील, डॉ.विजय रोकडे, डॉ.विकास जाधव, डॉ.सुनिल खराडे, डॉ.महेश पाटील, विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक आणि क्रीडाप्रेमी जनता मोठया संख्येने उपस्थित होते.
खेळाडूंसाठी मानसशास्त्र आणि नैतिकता अत्यंत महत्वाचे - क्रीडा आहारतज्ज्ञ अवंती दामले
|