बातम्या

जनगणनेतील माहितीची गुणवत्ता आणि सत्यता महत्वाची - संचालक, डॉ. निरुपमा डांगे

Quality and authenticity of census information is important


By Administrator - 2/3/2026 4:43:34 PM
Share This News:



जनगणनेतील माहितीची गुणवत्ता आणि सत्यता महत्वाची - संचालक, डॉ. निरुपमा डांगे

जनगणना कार्यालयाचे उद्घाटन आणि आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर, दि. २ : जनगणना ही पुढील दोन दशकांसाठी देशाची ध्येयधोरणे आणि भविष्यातील नियोजनाचा आधार ठरणार आहे. त्यामुळे माहितीची गुणवत्ता आणि सत्यता राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र राज्याच्या जनगणना संचालिका डॉ. निरुपमा डांगे यांनी व्यक्त केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली आगामी जनगणनेच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर 'जिल्हा जनगणना कार्यालयाचे' उद्घाटन त्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर आयोजित मुख्य आढावा बैठकीत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना केल्या.

या बैठकीस जिल्हाधिकारी तथा प्रमुख जिल्हा जनगणना अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव, उपसंचालक जनगणना प्रवीण भगत, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व 'चार्ज ऑफिसर', तहसीलदार आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डॉ. डांगे यांचे स्वागत पर्यटन पुस्तिका आणि राजर्षी शाहू महाराजांची प्रतिकृती भेट देऊन केले.

डॉ. निरुपमा डांगे यांनी जनगणनेच्या तांत्रिक रचनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून त्यांना प्रशिक्षित करावे. माहिती गोळा करताना कोणताही भाग सुटणार नाही किंवा त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. तसेच, जनगणना कक्षासाठी पूर्णवेळ मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन या राष्ट्रीय कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्याच्या तयारीचे सादरीकरण करताना माहिती दिली की, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्याची 'प्री-टेस्ट' (पूर्व-चाचणी) साठी निवड करण्यात आली होती. या तालुक्यातील ४५ गावांमध्ये प्रायोगिक काम पूर्ण केले आहे. महापालिका क्षेत्रातील तयारीचे सादरीकरणही संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी केले.

बैठकीच्या शेवटी, डॉ. डांगे यांनी कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा असून सर्वांनी मिळून अचूक आणि पारदर्शक काम करावे, हे सांगत कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित अधिकाऱ्यांच्या शंकांचेही त्यांनी यावेळी निरसन केले.


जनगणनेतील माहितीची गुणवत्ता आणि सत्यता महत्वाची - संचालक, डॉ. निरुपमा डांगे
Total Views: 14