बातम्या
व्यसनमुक्त आणि संस्कारीत समाजासाठी युवा संस्कार शिबिरे काळाची गरज : राजू शेट्टी
By nisha patil - 5/24/2026 7:05:40 PM
Share This News:
व्यसनमुक्त आणि संस्कारीत समाजासाठी युवा संस्कार शिबिरे काळाची गरज : राजू शेट्टी
बाहुबली (प्रतिनिधी) : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत आणि आधुनिकतेच्या युगात व्यसनाधीनता ही समाजासमोरील सर्वात मोठी आणि चिंताजनक समस्या बनली असून, तरुण पिढीला या जीवघेण्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक समाजाने पुढाकार घेऊन युवा संस्कार शिबिरे आयोजित करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन Raju Shetti यांनी केले.
बाहुबली येथे आयोजित सम्यक ज्ञान विद्या संस्कार शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आजची तरुण पिढी ही देशाचे भविष्य असल्याचे सांगत नैराश्य, चुकीची संगत, सोशल मीडियाचा अतिवापर आणि पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण यामुळे अनेक तरुण अंमली पदार्थ, दारू आणि इतर घातक व्यसनांच्या आहारी जात असल्याची खंत व्यक्त केली. यामुळे केवळ एका व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी केवळ शासकीय कायदे किंवा पोलीस कारवाई पुरेशी नसून कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर व्यापक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक समाज घटकाने आपल्या भागात तरुण-तरुणींसाठी विशेष संस्कार शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शांती विद्या ज्ञानसंवर्धन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दहा दिवसीय शिबिरात १२०० हून अधिक युवक-युवतींना धर्मसंस्कार, व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य, अध्यात्म, नैतिक मूल्ये आणि कौटुंबिक संस्कार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरास प.पू. आचार्य श्री उत्कृष्टसागरजी महाराज, प.पू. सुगम्यसागर महाराज, प.पू. स्वभावसागरजी महाराज, प.पू. आर्यिका निष्काममती माताजी, आर्यिका विरकमती माताजी, आर्यिका ध्रुवीमती माताजी यांच्यासह शिबिराचे मुख्य संयोजक तात्याभैय्या नेजकर, गोमटेश बेडगे, तात्या अथणे, वृषभ जैन तसेच श्रावक-श्राविका, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यसनमुक्त आणि संस्कारीत समाजासाठी युवा संस्कार शिबिरे काळाची गरज : राजू शेट्टी
|