बातम्या
विवेकानंद कॉलेजच्या एन एस एस विभागातर्फे मातोश्री वृद्धाश्रमात रक्षाबंधन उत्साहात
By nisha patil - 8/29/2026 12:55:51 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजच्या एन एस एस विभागातर्फे मातोश्री वृद्धाश्रमात रक्षाबंधन उत्साहात
कोल्हापूर दि.29 : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम येथे रक्षाबंधनाचा सामाजिक उपक्रम उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना राखी बांधून त्यांच्याप्रती आदर, आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त केली. तसेच वृद्धांचा सन्मान करण्याबरोबरच आई-वडिलांचा सांभाळ करण्याचा आणि त्यांच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाचे श्री. शरद पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना वृद्धाश्रमाची स्थापना, कार्यपद्धती, वृद्धांना दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती दिली. समाजामध्ये वृद्ध व्यक्तींना योग्य तो सन्मान आणि प्रेम मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे मार्गदर्शन करताना शरद पाटोळे यांनी, “आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी संपूर्ण आयुष्य त्याग आणि कष्टामध्ये घालवलेले असते. त्यामुळे त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना आधार देणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन केले. वृद्धांकडे केवळ सहानुभूतीने न पाहता त्यांना कुटुंबाचा आणि समाजाचा महत्त्वाचा घटक म्हणून सन्मानाने वागवावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना प्रेमपूर्वक राखी बांधली. यावेळी विद्यार्थ्यांनी वृद्धांचे आशीर्वाद घेतले. “वृद्धांचा सन्मान करू, आई-वडिलांची काळजी घेऊ आणि त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना एकटे पडू देणार नाही,” असा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये स्नेहाचे आणि आपुलकीचे नाते निर्माण झाले.
कार्यक्रमाला विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सामाजिक जाणीव आणि मानवतावादी दृष्टिकोन विकसित होतो, विद्यार्थ्यांनी घेतलेला संकल्प आणि वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान यामुळे कार्यक्रमाला भावनिक व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले. असे प्राचार्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संदीप पाटील यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. राजश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त करून रक्षाबंधनाच्या सामाजिक आणि भावनिक महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी प्रा. डॉ. प्रविण बागडे, प्रा. आर. आर. माने, ज्युनिअर विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. हेमंत पाटील, प्रा. मंगल गवळी, प्रा. स्वाती ढगे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. सचिन धनवडे, श्री. सदानंद दुर्गुळे तसेच महाविद्यालयातील इतर प्रशासकीय सेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विवेकानंद कॉलेजच्या एन एस एस विभागातर्फे मातोश्री वृद्धाश्रमात रक्षाबंधन उत्साहात
|