बातम्या
*रणरागिणी शेतकरी गटाचाही वृक्षलागवडीत पुढाकार
By nisha patil - 8/21/2026 7:42:42 PM
Share This News:
*रणरागिणी शेतकरी गटाचाही वृक्षलागवडीत पुढाकार
*बोलकेवाडीच्या गायराण क्षेत्रात देशी वाणांच्या २०० वृक्षांची लागवड
आजरा(हसन तकीलदार)-: येथील गायरान क्षेत्रात रणरागिणी शेतकरी गटाच्या वतीने देशी वाणांच्या २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. पंचायत समिती आजराचे कृषी विस्तार अधिकारी दिनेश शेटे, सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र)चे जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील, प्रदेश सरचिटणीस राजू पोतनिस, कृषी सहाय्यक तृप्ती पाटील व योगेश जगताप यांच्या हस्ते हा वृक्षलागवड कार्यक्रम झाला.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी वैभव गुरव, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच रणरागिणी शेतकरी गटाच्या महिला व पुरुष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शेतकरी गटाच्या महिला निमंत्रक सौ. नीता वसंत बोलके यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुरुष निमंत्रक किशोर उत्तम कातकर यांनी शेतकरी गटामार्फत गावात सामुदायिक शेतीची संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याचे सांगितले. गटाच्या माध्यमातून एकत्रितपणे काम केल्यास अवघड वाटणारी कामेही सहज शक्य होतात, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र)चे जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील म्हणाले, “भारत हा कृषीप्रधान देश असून शेती करणे ही अभिमानाची बाब आहे. मात्र, अन्नधान्य पिकविण्यासाठी शेतात काम करणे कमीपणाचे आहे, अशी मानसिकता समाजात निर्माण होणे ही चिंतेची बाब आहे. शेतकरी गटांच्या माध्यमातून सामुदायिक शेतीसह पर्यावरण संवर्धनासाठी घेतला जाणारा पुढाकार ही मानसिकता बदलण्यास निश्चितच मदत करेल.त्याचप्रमाणे पुढे ते म्हणाले की, तापमानवाढीमुळे अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि वादळे यांसारख्या नैसर्गिक संकटांमध्ये वाढ होत असून त्याचा थेट परिणाम शेती व पिकांच्या उत्पादनावर होत आहे.
कमी झालेले वृक्षाच्छादन हे तापमानवाढीस चालना देत आहे. त्याचबरोबर कीटकांची संख्या कमी झाल्याने परागीभवनाच्या प्रक्रियेवरही परिणाम होत आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाला विशेष महत्त्व असून रणरागिणी शेतकरी गटाने या उपक्रमात घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.
कृषी विस्तार अधिकारी दिनेश शेटे यांनी रणरागिणी शेतकरी गटाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. शेतकरी गटाने आपल्या कामाची व्याप्ती वाढवूजिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
सरपंच परिषदेच्या माध्यमातून विनामोबदला झाडे उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाध्यक्ष
जी.एम पाटील यांचे शेतकरी गटाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले
यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस राजू पोतनिस, कृषी सहाय्यक तृप्ती पाटील व योगेश जगताप यांनीही मनोगते व्यक्त केली.
वृक्षलागवड उपक्रमासाठी बोलकेवाडी येथील उत्तम कातकर, देवेंद्र बोलके, शिवाजी कोलेकर, ज्ञानदेव बोलके, शिवाजी कातकर, कविता बोलके तसेच रणरागिणी शेतकरी गटाच्या सौ. अश्विनी विवेक कोळेकर, सौ. गीता आण्णासों बोलके, सौ. मंगल संजय बोलके, सौ. नीता वसंत बोलके, सौ. पुष्या शिवाजी बोलके, सौ. रुपाली संदीप कोळेकर, सौ. सारिका परशराम बोताक, सौ. सरिता सुरेश बोलके, सौ. शालन पांडुरंग डोंगरे, सौ. सुनिता शिवाजी कोलेकर, सौ. सुवर्णा संतोष भादवणकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत अधिकारी वैभव गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*रणरागिणी शेतकरी गटाचाही वृक्षलागवडीत पुढाकार
|