बातम्या
मुख्याध्यापक रविंद्र सिदनाळे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न
By nisha patil - 7/26/2026 11:24:43 PM
Share This News:
मुख्याध्यापक रविंद्र सिदनाळे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न
दत्तवाड (प्रतिनिधी : आचिन हेरवाडे) : "गुरुचे स्थान समाजात अत्यंत महत्त्वाचे असून, सेवानिवृत्तीनंतरही शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात आपले ज्ञान, अनुभव आणि मार्गदर्शन समाजासाठी देत राहावे," असे प्रतिपादन शिरोळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे यांनी केले.
दत्तवाड येथील कुबेर हॉलमध्ये आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक रविंद्र सिदनाळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी विविध मान्यवरांनी सिदनाळे सरांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला, सामाजिक कार्याला आणि विद्यार्थी घडविण्यातील योगदानाला गौरवपूर्ण शब्दांत सलाम केला.
शिक्षक नेते राजाराम वरूटे म्हणाले, "रविंद्र सिदनाळे हे केवळ शिक्षक नसून शिक्षक संघटनेच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व आहे."
बबन चौगुले यांनी आपल्या मनोगतात सांगितले, "सिदनाळे सर मनाने सदैव तरुण आहेत. निवृत्तीनंतरही त्यांनी समाजहिताचे कार्य याच जोमाने सुरू ठेवावे."
विजितसिंह शिंदे (सरकार) यांनीही सिदनाळे सरांच्या अनुभवाचा गौरव करत, त्यांनी पुढील काळातही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून घडलो : रविंद्र सिदनाळे
सत्काराला उत्तर देताना रविंद्र सिदनाळे भावूक झाले. ते म्हणाले, "मामा महावीर उपाध्ये यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभा राहू शकलो. मुख्याध्यापकांच्या शिस्तीमुळे वेळेचे महत्त्व आणि गुणवत्तापूर्ण काम करण्याची सवय लागली. तसेच आदर्श सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे माझ्या सेवाकाळात उत्तम काम करता आले."
समारंभाच्या अध्यक्षस्थानी महावीर उपाध्ये होते. प्रास्ताविक राजू जुगळे यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ. शिंदे सरकार (वाहिनी)सौ. बबीता बाबासाहेब वनकोरे, माजी सरपंच चंद्रकांत कांबळे, राजगोंडा पाटील (गुमटे), आई चळणादेवी सिदनाळे, बाजीराव कांबळे, प्रशांत पोतदार, केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे, संजय निकम यांच्यासह टाकळीवाडी, हेरवाड, दत्तवाड परिसरातील शिक्षक, ग्रामस्थ, पालक, नातेवाईक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत गुंडा परीट यांनी केले, तर आभार कुमार सिदनाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी रविंद्र सिदनाळे यांना निरोगी, आनंदी आणि समाजसेवेने परिपूर्ण पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक रविंद्र सिदनाळे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न
|