बातम्या
चाफोडी तर्फ तारळे(ता. राधानगरी) ग्रामपंचायतीचा स्मार्ट मीटर बसविण्याचा ठराव
By nisha patil - 8/31/2026 8:45:53 PM
Share This News:
चाफोडी तर्फ तारळे(ता. राधानगरी) ग्रामपंचायतीचा स्मार्ट मीटर बसविण्याचा ठराव
सिरिज मीटरद्वारे ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन झाल्याने ठरावास एकमताने मंजूरी
महावितरणच्या ग्राहक समाधान शिबिरास यश
कोल्हापूर, दि. ३१ ऑगस्ट २०२६: चाफोडी तर्फ तारळे (ता.राधानगरी, जि.कोल्हापूर) ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात स्मार्ट मीटर बसविण्याबाबतचा ठराव ग्रामसभा घेऊन एकमताने नुकताच मंजूर केला. गावात महावितरणने ‘ग्राहक समाधान शिबीर’ घेऊन स्मार्ट मीटरचे फायदे, कार्यपद्धती तसेच मीटर रीडिंगबाबत असलेल्या शंकांचे निरसन केले. तसेच सिरिजमध्ये लावलेले जुने व स्मार्ट मीटर यांचे रीडिंग सारखेच आल्याने ग्रामस्थांनी गावामध्ये स्मार्ट मीटर बसविण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
चाफोडी तर्फ तारळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठराव क्रमांक १६(१) नुसार स्मार्ट मीटर बसविण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी महावितरणच्या राधानगरी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे, शिरगावचे सहायक अभियंता रोहित कोळी, प्रधान तंत्रज्ञ युवराज चौगले यांनी ग्रामस्थांना स्मार्ट मीटरची आवश्यकता, फायदे व गैरसमज याबाबत सविस्तर माहिती दिली.
दरम्यान, सध्याचे जुने वीज मीटर आणि नवीन स्मार्ट मीटर यांच्या मीटर रीडिंगबाबतही ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. महावितरणने यापूर्वीच मागणीनुसार गावातील दहा ग्राहकांना जुने मीटर व नवे स्मार्ट मीटर सिरिज मध्ये बसवले होते. ग्रामस्थांनी दोन्ही मीटरचे रीडिंग प्रत्यक्ष तपासून पहिले असता, दोन्ही मीटरचे रीडिंग एकसारखे असल्याचे निदर्शनास आले. स्मार्ट मीटर बसविण्याबाबत ग्रामसभेत झालेल्या सविस्तर चर्चेमुळे ग्रामस्थांच्या मनातील शंका दूर झाल्या.
स्मार्ट मीटर ग्राहकाच्या फायद्याचे – सरपंच भिकाजी चौगुले
राज्य शासनाने नवीन तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट मीटरबाबत घेतलेला निर्णय ग्राहकांच्या फायद्याचा आहे. यामुळे वीज वापरावर ग्राहकाचे नियंत्रण राहणार असून सर्व माहिती मोबाईलवर मिळणार आहे. गावकर्यांच्या सर्व शंकांचे निरसन महावितरणने ‘ग्राहक समाधान शिबिरात’ केल्याने आम्ही हा ठराव एकमताने मंजूर केला आहे.
ग्राहकांच्या सर्व शंकांचे निरसन करणार – महावितरण
महावितरणकडून वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर मोफत बसवण्यात येत आहेत. स्मार्ट मीटर हे अत्यंत पारदर्शक असून याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटरबाबत कोणत्याही अफवा अथवा गैरसमजांवर विश्वास न ठेवता संबंधित महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून अधिकृत माहिती घ्यावी. वीज ग्राहकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यास महावितरण कटिबद्ध आहे.
चाफोडी तर्फ तारळे(ता. राधानगरी) ग्रामपंचायतीचा स्मार्ट मीटर बसविण्याचा ठराव
|