बातम्या
प्रस्तावित एमआयडीसीविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
By nisha patil - 8/21/2026 3:37:27 PM
Share This News:
प्रस्तावित एमआयडीसीविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
प्रस्तावित एमआयडीसीच्या विरोधातील लढ्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आतापर्यंत झालेल्या आंदोलनाचा आढावा घेण्यात आला. चौकशी अहवाल येईपर्यंत एमआयडीसीची प्रक्रिया थांबवण्यात आली असली, तरी आमदार, उद्योगमंत्री आणि प्रशासनावर केवळ विश्वास ठेवून चालणार नाही. एमआयडीसी रद्द होईपर्यंत हा लढा अधिक ताकदीने आणि जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी सर्वानुमते व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, एमआयडीसी रद्द होण्याची भीती निर्माण झाल्याने आमदारांकडून विविध स्टेटमेंट देण्यास सुरुवात झाली असून, अतिक्रमणाचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. टाकळी आणि टाकळीवाडी ही स्वतंत्र महसुली गावे असताना त्यांना एकत्रित जोडून अतिक्रमण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गट क्रमांक ११८० हा शहीद जवानांच्या वीरमाता व वीरपत्नींना त्यांच्या कामगिरीबद्दल वाटप करण्यात आलेला आहे. तसेच गट क्रमांक ९७० हा १९८९ मध्ये हद्दवाढीच्या अनुषंगाने तत्कालीन ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भूमिहीन शेतमजूर व मागासवर्गीय बांधवांना वाटप केलेला आहे.
शिल्लक असलेले गायरान क्षेत्र हे नदीचे उपपात्र असल्याने त्याबाबतही वस्तुस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आमदारांनी ‘आपलं ठेवायचं झाकून आणि गावाचं बघायचं वाकून’ ही भूमिका बंद करावी, अशी टीका करण्यात आली.
आमदार यड्रावकर यांच्यावर अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करताना, “कोल्हापूर जिल्हा सूतगिरणीची सुरुवात केली तर पाठवायला जागा राहणार नाही,” असे सांगत त्यांच्या भूमिकेवर सडकून टीका करण्यात आली.
या लढ्यामध्ये समविचारी सर्व पक्ष, संघटना तसेच जयसिंगपूरवासीयांनी केलेल्या सहकार्याबद्दल गावातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. आगामी काळात एमआयडीसीविरोधातील प्रशासकीय पातळीवरील लढ्याबरोबरच व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा निर्धार दिपक पाटील यांनी व्यक्त केला.
बैठकीचे स्वागत अमर पाटील यांनी केले, तर आभार विजय गायकवाड यांनी मानले.
यावेळी संभाजी पाटील, ए. वाय. पाटील, विजय गायकवाड, विजय पाटील, नवनाथ पाटील, प्रदीप पाटील, अमर पाटील, अमर वासमकर, दिलीप पाटील, राजेश पाटील, राजेश कदम, शामराव पाटील, नितीन पाटील, हनुमंत पाटील, गणेश सावंत, अरुण पाटील, रोहन पाटील, सुरेश पाटील, सतीश सावंत, धनाजी पाटील, सौरभ पाटील, प्रकाश पाटील, सचिन वाणी, अशोक पाटील, संदीप पाटील, संजय पाटील, रणजीत पाटील, बाळासो पाटील, मधुकर गायकवाड, सिद्धी पाटील, किरण बिरणगे, शाहीर चावरे यांच्यासह माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर व प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते.
प्रस्तावित एमआयडीसीविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
|