बातम्या
आंबा घाटातील विसावा पॉईंटजवळ रस्ता खचला; महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला..
By nisha patil - 7/31/2026 7:26:44 PM
Share This News:
आंबा घाटातील विसावा पॉईंटजवळ रस्ता खचला; महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला..
तारा न्युज प्रतिनिधी अजित बोडके कोल्हापूर–रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटातील विसावा पॉईंट परिसरात रस्त्याचा काही भाग अचानक खचून मोठ्या भेगा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याशिवाय रस्त्यालगतच्या संरक्षक कटड्याच्या भराव्यालाही तडे जाऊन तो खचल्याने या मार्गावरील वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला होता. मात्र, हातखंबा महामार्ग पोलिसांच्या वेळेवर केलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अपघात आणि जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, हातखंबा महामार्ग पोलिसांचे पथक नेहमीप्रमाणे आंबा घाट परिसरात गस्त घालत असताना विसावा पॉईंटजवळील रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्याचे आणि रस्ता खचल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी बॅरिकेड्स उभारले व वाहनचालकांना सावधगिरीचा इशारा देत वाहतूक नियंत्रित केली. त्यामुळे वाहने सुरक्षितपणे मार्गस्थ करण्यात यश आले.
घटनेची माहिती महामार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या संबंधित कंपनीला त्वरित देण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून खचलेल्या भागाची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
आंबा घाट हा कोल्हापूर–रत्नागिरी मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा घाटमार्ग आहे. सध्या या मार्गावर नवीन रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्यावर भेगा पडणे, भरावा खचणे आणि संरक्षक कटड्याला तडे जाणे या प्रकारामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मार्गावरून दररोज शेकडो मालवाहू, प्रवासी आणि खासगी वाहने प्रवास करत असल्याने वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे घाट परिसरात दरड कोसळणे, रस्ते खचणे आणि भराव्याचे नुकसान होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी महामार्गाच्या कामाची गुणवत्ता तपासून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, तसेच धोकादायक ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
आंबा घाटातील विसावा पॉईंटजवळ रस्ता खचला; महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला..
|