बातम्या

गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांच्या परतीसाठी जादा एसटी गाड्या सोडा - आजरा आगार प्रमुखांना निवेदन

Run extra ST buses for the return journey


By nisha patil - 4/9/2026 11:29:11 PM
Share This News:



गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांच्या परतीसाठी जादा एसटी गाड्या सोडा - आजरा आगार प्रमुखांना निवेदन
 

आजरा(हसन तकीलदार):-सद्या गणेशोत्सवाचा सण असलेने बाहेरगावी असलेले चाकरमानी आपल्या कुटुंबात गावी येऊन गणेशोत्सव साजरा करीत आहेत. आपल्या कुटुंबासोबत, आपल्या कुळासोबत गणपती सण साजरा करून गणेशोत्सवाचा आनंद उरकून गणपती विसर्जानानंतर पुन्हा कर्मभूमीकडे निघणाऱ्या चाकरमान्यांची परतीच्या प्रवासात होणारी परवड आणि हाल थांबवण्यासाठी एसटी प्रशासनाने तातडीने अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन करावे, अशी जोरदार मागणी आज निवेदनाद्वारे आगार प्रमुखांकडे करण्यात आली.

सण संपल्यानंतर स्थानकांवर होणारी गर्दी, गाड्या वेळेत न मिळणे आणि ताटकळत राहावे लागणे यांमुळे चाकरमान्यांचे अतोनात हाल होतात. हे हाल टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेत योग्य पावले उचलावीत आणि गरजेनुसार फेऱ्या वाढवाव्यात असा सूर या प्रसंगी उमटला.यासाठी आजरा आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे.
 

   या निवेदनाची गंभीर दखल घेत आगार प्रमुखांनी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. प्रवाशांच्या सोयीसाठी पुरेशा अतिरिक्त गाड्या सोडल्या जातील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याशिवाय आणखीन एक मोठा दिलासा देताना त्यांनी सांगितले की, जर एखाद्या गावातून एकाच मार्गावर जाणारे ४० प्रवासी एकत्र आले, तर एसटी थेट त्यांच्या गावात जाऊन त्यांना इच्छित स्थळी पोहोचवेल. त्यासाठी कितीही गाड्या लागल्या तरी प्रशासनाची पूर्ण तयारी असेल, असा शब्द आगार प्रमुखांनी दिल्याने चाकरमान्यांची परतीची वाट सुकर होणार आहे.
     

निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीरभाऊ देसाई, वृषाल हुक्केरी, किशोर जाधव, शंकर सुतार आणि सचिन इंदुलकर  उपस्थित होते. लालपरी आणि मुंबई-ठाण्यात राबणाऱ्या चाकरमान्यांचे नाते जिव्हाळ्याचे आहे. त्यामुळे विसर्जनानंतर परतणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन जादा गाड्यांचे वेळापत्रक आणि आरक्षण वेळेत जाहीर करावे, अशी विनंती लोकप्रतिनिधींनी केली.


गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांच्या परतीसाठी जादा एसटी गाड्या सोडा - आजरा आगार प्रमुखांना निवेदन
Total Views: 258