बातम्या
गणेशोत्सवासाठी मुंबई-कोकणला एसटी धावली; कोल्हापुरातील रोजच्या प्रवाशांची मात्र फरफट!
By nisha patil - 11/9/2026 3:29:22 PM
Share This News:
गणेशोत्सवासाठी मुंबई-कोकणला एसटी धावली; कोल्हापुरातील रोजच्या प्रवाशांची मात्र फरफट!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कोकण भागातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन करत बसेस रवाना केल्या आहेत. मात्र, या नियोजनाचा फटका आता कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना बसताना दिसत आहे. कामानिमित्त दररोज कोल्हापुरात येणाऱ्या तसेच शहरातून आपल्या गावाकडे परतणाऱ्या प्रवाशांना नियमित बसफेऱ्या वेळेवर मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. आधीच एसटीच्या अनियमित फेऱ्यांमुळे कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होत असताना, गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात बसेस मुंबई आणि कोकणाकडे वळवल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
विशेषतः महिला कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या सामान्य प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे. काम आटोपून घरी जाण्यासाठी बसस्थानकात पोहोचल्यानंतर वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी, रात्री उशिरा घरी पोहोचण्याची वेळ येत असून प्रवाशांच्या वेळेबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
गणेशोत्सव हा मोठा सण असला तरी उत्सवाच्या नियोजनासाठी रोजच्या प्रवाशांना वेठीस धरले जाऊ नये, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. मुंबई आणि कोकणासाठी विशेष बसेस उपलब्ध करून देतानाच कोल्हापूर आणि ग्रामीण भागातील नियमित प्रवाशांसाठी पुरेशा बसफेऱ्या सुरू ठेवणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. एसटी महामंडळाने उत्सवाचे नियोजन करताना रोजच्या प्रवाशांचा विचार केला आहे का? असा सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. बसफेऱ्यांचे योग्य नियोजन करून वेळापत्रकानुसार आणि नियमित बससेवा सुरू ठेवावी, अतिरिक्त बसेस उपलब्ध करून द्याव्यात आणि प्रवाशांना ताटकळत ठेवण्याची वेळ येऊ देऊ नये, अशी जोरदार मागणी होत आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई-कोकणला एसटी धावली; कोल्हापुरातील रोजच्या प्रवाशांची मात्र फरफट!
|