बातम्या
मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारे संत तुकाराम: उल्हास पाटील
By Administrator - 3/14/2026 1:28:30 PM
Share This News:
मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारे संत तुकाराम: उल्हास पाटील
कोल्हापूर, दि. १३ मार्च: संत तुकाराम हे मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारे महान संत आहेत, असे प्रतिपादन ह. भ. प. उल्हास पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने आयोजित संत तुकाराम व्याख्यानमालेअंतर्गत संत तुकारामांचा मानवतावाद या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते.
उल्हास पाटील म्हणाले, समाजाचा दडपलेला आवाज उठवणारा संत म्हणून तुकारामांकडे पाहिले जाते. गुलामगिरीविरूध्द लढण्याची प्रेरणा संत तुकाराम यांच्या मानवतावादातून मिळते. संत तुकारामांचे अभंग माणसाला माणूस बनविण्याचे काम करतात. संत तुकारामांची भक्ती केवळ धार्मिक स्वरूपाची नसून ती सामाजिक, समता, करूणा आणि मानवतेचा व्यापक संदेश देणारी आहे.
कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, संत तुकारामांच्या अभंगातील मानवतावादी विचार समजून घेतला पाहिजे आणि संत साहित्याच्या अभ्यासातून प्रेरणा घेऊन समाजातील भेदभाव, अंधश्रध्दा आणि अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे प्रमुख उपस्थितीत होते. सुत्रसंचालन भक्ती नाईक यांनी केले तर अमोल देशमुख यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी प्रा. टी. एस. पाटील, प्रा. अवनीश पाटील, प्रा. अक्षय सरवदे, प्रा. शिवकुमार सोनाळकर, प्रा. दशरथ पारेकर, प्रा. मांतेंश हिरेमठ, प्रा. प्रकाश दुकळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारे संत तुकाराम: उल्हास पाटील
|