बातम्या
साळगाव ता. आजरा येथे देशी आणि स्थानिक प्रजातीच्या रोपांचे वितरण*
By nisha patil - 7/19/2026 8:38:27 PM
Share This News:
**साळगाव ता. आजरा येथे देशी आणि स्थानिक प्रजातीच्या रोपांचे वितरण*
*आजरा(हसन तकीलदार)*:-साळगाव ता.आजरा येथे ग्रामपंचायत साळगांव, सरपंच परिषद,मुंबई (महाराष्ट्र) व हरित क्रांती नैसर्गिक शेती शेतकरी गट यांच्या वतीने ग्रामस्थांना विविध स्थानिक व देशी प्रजातिच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
लोकनियुक्त सरपंच धनंजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वृक्षवितरणाच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक समन्वयक महादेव
निऊंगरे यांनी केले. पर्यावरण बदलासारख्या वैश्विक समस्येला आपल्याला सामोरे जावे लागत असताना, त्यामधील भिषणता तापमानवाढीमुळे गेल्या दोन वर्षात अधिक प्रमाणात भासत आहे. निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे.त्यावरील उपाय अथवा पर्याय हा स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची जास्तीत जास्त लागवड करणे व आपला भूभाग अधिक वृक्षाछादित करणे हे आहे.या प्रमुख उद्देशाने आपण या कार्यक्रमाचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर हरित कांती नैसर्गिक शेती शेतकरी गटाच्या माध्यमातून जास्तित जास्त झाडे लावून त्याचे जतन करण्यासाठीची विनंतीही ग्रामस्थाना त्यांनी केली.
आपल्या मनोगतामध्ये सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजि. जी.एम. पाटील म्हणाले जल, जंगल,जमिन यांचा काटकसरीने वापर न केल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. आणि त्याचे परिणाम म्हणून तापमानवाढ, अतिवृष्टी, दुष्काळ, त्सुनामी अशा परिणामांना सामोरे जावे लागत आहे. पृथ्वीतलावरील घटत चाललेली वृक्षांची संख्या यामुळेच पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. ही बाब खूप गांभिर्याने घेण्याची गरज आहे. नवनिर्मिती पेक्षा आहे ते आबाधित ठेवण्यावर भर देऊन जल, जंगल, जमिन यांचा काटकसरीने शास्त्रशुद्ध वापर करणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी म्हटले.
प्रदेश सरचिटणीस राजू पोतणीस म्हणाले,वृक्षलागवडीसाठी साळगांव गावातील लोकांनी घेतलेल्या पुढाकाराने या भागामध्ये जास्तीत जास्त वृक्षांची लागण तर होईलच पण जतन करण्यामध्ये येथिल ग्रामस्थ कोठेही कमी पडणार नाहीत आणि त्यासाठी सरपंच धनंजय पाटील व शेतकरी गटाचे पांडूरंग पाटील व दयानंद कांबळे यांनी घेतलेल्या पुढाकाराचेही त्यांनी कौतूक केले, यावेळी सोहाळे-बाचीच्या सरपंच सौ. भारतो डेळेकर, माध्य. शिक्षक श्री. रविंद्र देसाई पेरणोली यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
गावातील मान्यवरांच्या वतीने पुष्प व झाडे देऊन महिला तालुकाध्यक्षा सौ. वनश्री देसाई ( सरपंच पेरणोली), सोहाळेच्या सरपंच सौ. भारती डेळकर व इतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आहे.
पर्यावरण संवर्धनामध्ये ( वणवा निर्मुलन मोहीम, वृक्ष निर्मिती,वृक्ष लागवड, व जतन)सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्रने )कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरु केलेले काम उल्लेखनिय असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत त्यांच्या कार्यामध्ये साळगाव ग्रामस्थही मनापासून सहभाग नोंदवतील अशी ग्वाही साळगावचे लोकनियुक्त सरपंच धनंजय पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये दिली. त्याचबरोबर परिषदेने मोफत झाडे उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभारही व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष ज्ञानदेव जाधव, ग्राम.प.चे माजी उपसरपंच अरविंद गावडे, ज्ञानदेव जाधव, माजी कृषीसहाय्यक पांडूरंग वेंगुळकर, शिवाजी कांबळे, बाबू बादेस्कर,अशोक तानवडे, कृष्णा नार्वेकर, कृष्णा निऊंगरे, रामचंद्र भाडभगत, विलास दोरुगडे, निवृत्ती भालेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
हरित क्रांती नैसर्गिक शेती शेतकरी गटाचे अध्यक्ष पांडूरंग पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
साळगाव ता. आजरा येथे देशी आणि स्थानिक प्रजातीच्या रोपांचे वितरण*
|