बातम्या
साळगाव फाट्यावर बस थांबा व निवाऱ्याची मागणी*
By nisha patil - 8/27/2026 12:11:19 PM
Share This News:
*साळगाव फाट्यावर बस थांबा व निवाऱ्याची मागणी*
**आजरा(हसन तकीलदार)*:-नव्यानेच सुरु केलेल्या संकेश्वर बांदा महामार्गावर साळगाव फाटा आहे. याठिकाणी प्रवास्यांना उभे राहण्यासाठी बस थांबा निवाऱ्याची गरज आहे. याठिकाणी बस थांबा सुरु करून निवारा बांधण्याची मागणी आजरा प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे. यासाठी संघटनेकडून आजरा आगार व्यवस्थापकना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आजरा गडहिंग्लज महामार्गावर स्थित 'साळगाव फाटा' हा परिसरातील दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे. या फाट्यावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि महिला प्रवाशांची मोठी ये-जा सुरु असते. साळगाव फाट्यापासून जवळच शासकीय शैक्षणिक संस्था आयटीआय कॉलेज (ITI), शासकीय मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह आहेत तर जवळच विद्यानगर, कमलकुंज सोसायटी, जॉन फर्नांडिस नगर व आजरा शहरातील इतर उपनगरे आहेत. या लगतच साळगाव, पेरणोली, हरवडे, कोरीवडे, देवकांडगाव तसेच गारगोटी मार्गाकडे जाणारे प्रवासी आहेत.या परिसरात वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, आयटीआय कॉलेजचे विद्यार्थी आणि आजरा शहरात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. परंतु, साळगाव फाटा येथे अधिकृत 'बस स्टॉप' नसल्याने बसेस थांबत नाहीत, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होतात. तसेच येथे 'बस शेड' नसल्याने उन्हाळ्यात कडक ऊन आण णि पावसाळ्यात मुसळधार पावसात प्रवाशांना विशेषतः विद्यार्थिनी व ज्येष्ठ नागरिकांना उघड्यावर ताटकळत उभे राहावे लागते. जर या ठिकाणी अधिकृत बस स्टॉप घोषित करून बस शेड उभारण्यात आले आणि सर्व ये-जा करणाऱ्या बसेसना विशेषतः आजरा, गडहिंग्लज आणि गारगोटी मार्गावरील येथे २ मिनिटांचा थांबा देण्यात आला तर हजारो प्रवाशांची मोठी सोय होईल. त्यामुळे साळगाव फाटा येथे तात्काळ अधिकृत बस स्टॉप मंजूर करण्यात यात यावा आणि प्रवाशांच्या सोयीसाठी बस शेड उभारणीस प्रशासकीय मान्यता मिळावी.सर्व चालकांना साळगाव फाट्यावर गाड्या थांबवण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. आपण या जनहितार्थ मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर अध्यक्ष सचिन इंदुलकर, उपाध्यक्ष उदयसिंह सरदेसाई, सचिव विकास सुतार आदींच्या सह्या आहेत.
साळगाव फाट्यावर बस थांबा व निवाऱ्याची मागणी*
|