बातम्या

सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उग्र मोर्चा; तीव्र आंदोलनाचा इशारा

Satish patil


By nisha patil - 5/27/2026 5:18:18 PM
Share This News:



**अवसयनातून वगळण्यात आलेल्या दूध संस्थांचा निकाल तात्काळ जाहीर करून पात्र संस्थांना मतदानाचा अधिकार द्या- गडहिंग्लजकरांची मागणी*

*सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उग्र मोर्चा; तीव्र आंदोलनाचा इशारा*

आजरा(हसन तकीलदार)* कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अवसयनातून वगळण्यात आलेल्या दूध संस्थांचा निकाल तात्काळ जाहीर करून पात्र संस्थांना मतदानाचा अधिकार द्यावा, या मागणीसाठी गडहिंग्लज तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींनी सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार एल्गार पुकारत तीव्र मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत “न्याय द्या, अन्यथा संघर्ष अटळ!” असा इशारा देण्यात आला. 

गडहिंग्लज तालुक्यातील अनेक दूध संस्थांची सुनावणी होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला असतानाही सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर कार्यालयाकडून अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकरी आणि छोट्या दूध संस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला खडसावत, “सुनावणी पूर्ण झाली, कागदपत्रे सादर झाली, तरी निकाल रखडवण्यामागचे कारण काय? पात्र अथवा अपात्र याचा निर्णय तातडीने घ्या. अन्यथा शेतकरी व दूध उत्पादकांना सोबत घेऊन आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा दिला आहे..

गोकुळच्या लोकशाही प्रक्रियेत ग्रामीण भागातील दूध संस्थांना डावलण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. डोंगराळ आणि ग्रामीण भागातील लहान दूध संस्था प्रतिकूल परिस्थितीतही नियमित दूध संकलन करून शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मजबूत ठेवत आहेत. चाऱ्याचा तुटवडा, आर्थिक संकट आणि भौगोलिक अडचणी असतानाही या संस्था दूध पुरवठा अखंड ठेवत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. 

सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चामध्ये प्रकाश पताडे (चेअरमन – गोडसाखर, गडहिंग्लज), अरुण गवळी (संचालक – गोडसाखर), राकेश पाटील, हसन शेख, मलगोंडा पाटील, बसगोंडा पाटील, संग्राम पाटील, सुनील शिंदे, अमर पाटील, क्रांती मगदूम, विनायक पाटील, भीमराव राजाराम, प्रकाश पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध दूध संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

“शेतकऱ्यांच्या घामाचा आणि कष्टाचा आदर करा; दूध संस्थांना न्याय द्या, अन्यथा रस्त्यावरचा लढा अधिक तीव्र होईल,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) कोल्हापूर येथील कृष्णात ठाकरे यांनी लवकरात लवकर सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून पात्र संस्थांना मतदानाचा अधिकार दिला जाईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.,


सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उग्र मोर्चा; तीव्र आंदोलनाचा इशारा
Total Views: 306