बातम्या
*पंचायत समिती सभापती फेर निवडीसाठी 30 जुलै रोजी कार्यक्रम जाहीर
By nisha patil - 7/22/2026 12:11:17 PM
Share This News:
*पंचायत समिती सभापती फेर निवडीसाठी 30 जुलै रोजी कार्यक्रम जाहीर
*तालुक्यात खळबळ, निवडीत पेच निर्माण होण्याची शक्यता
*आजरा(हसन तकीलदार):- आजरा पंचायत समितीच्या सभापती जयश्री संजय गाडे यांचा जिल्हा जातपडताळणी समितीने मागास प्रवर्गाचा दाखला अवैध ठरविला. कोल्हापूर येथील सर्किट बेंचने या निर्णयाला अद्यापही स्थगिती दिलेली नसल्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी ३० जुलै 2026 ला तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या नवीन सभापतींची फेर निवड करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे.
सभेच्या नोटीसा सदस्यांना लागू करण्यात आल्यामुळे आजरा तालुक्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत जयश्री गाडे (रा. भादवण) या इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असलेल्या भादवण गणातून निवडून आल्या. आजरा पंचायत समितीचे सभापतिपद इतर मागास महिलेसाठी राखीव असल्याने त्या सभापतीही झाल्या. गाडे यांचा कुणबी जातीचा दाखला अवैध असल्याबाबत साधना संजय केसरकर यांनी जिल्हा जातपडताळणी समितीकडे २१ फेब्रुवारीला आक्षेप नोंदविला.
५ मार्चनंतर चार तारखांना दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. ५ जूनला अंतिम सुनावणी झाली. त्यानंतर जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष सुषमा सातपुते, सदस्य भारत केंद्रे व सदस्य सचिव संभाजी पोवार यांनी जयश्री गाडे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांचा कुणबी इतर मागास प्रवर्ग जातीचा दावा सिद्ध होत नसल्याने तो अवैध ठरविला. या निर्णयाविरोधात सौ. गाडे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जात पडताळणी समितीच्या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून अपील दाखल केली आहे मात्र त्याला अद्यापही स्थगिती मिळालेली नाही.
पंचायत समितीच्या सभापती निवडीत पेच प्रसंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतर मागास प्रवर्ग महिला सदस्या पंचायत समिती सभागृहात नाही. व त्याच प्रवर्गसाठी सभापतिपद राखीव असल्याने निवडीत पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
इतर मागास प्रवर्गाची पडताळणी दाखला देण्याची मुदत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असून सुद्धा निवडीची तारीख 30 जुलै जाहीर केली आहे. सर्किट बेंचमध्ये या प्रकरणी 28 जुलैला तारीख आहे. मात्र याबाबत तातडीने सुनावणी घेण्यासाठी सर्किटबेंचमध्ये विंनती अर्ज सादर करणार असल्याचे सौ. जयश्री गाडे यांनी संगितले.
20 जुलैच्या नोटीस मध्ये 30 जुलैला 10 ते 12 वाजेपर्यंत विशेष सभेपूर्वी पंचायत समितीच्या कार्यालयाच्या सभागृहात अर्ज स्वीकारणार, सभेच्या सुरवातीस नामनिर्देशन पत्राची छाननी, उमेदवारी माघारीसाठी 15 मिनिटांचा वेळ त्यानंतर लगेचच निवडणूकीचे कामकाज सुरु होईल असे नमूद करण्यात आले आहे.
*पंचायत समिती सभापती फेर निवडीसाठी 30 जुलै रोजी कार्यक्रम जाहीर
|