बातम्या

*स्कूल बस उलटली, कारची काच फोडली-सिरसंगीत गजराजाचे कारनामे

School bus overturns


By Administrator - 3/23/2026 3:04:02 PM
Share This News:



*स्कूल बस उलटली, कारची काच फोडली-सिरसंगीत गजराजाचे कारनामे

रानडुकरे,गव्यानंतर आता हत्तीच्या हैदोसाने परिसरातील शेतकरी हवालदिल

आजरा(हसन तकीलदार) सिरसंगी (ता. आजरा) येथे पहाटे तीनच्या सुमारास हत्तीने गावात घुसून घराशेजारी उभी केलेली स्कुलबस उलटून टाकली. तर तेथीलच ओमनी कारची पाठीमागील काच फोडली. या घटनेमुळे सिरसंगीसह तालुक्यात खळबळ उडाली असून, हत्तीच्या उपद्रवामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.वन खातेही अपयशी ठरत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
 

सिरसंगीसह किणे परिसरातील हत्ती व गव्यांकडून पीक नुकसानीचे सत्र सुरूच आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. पंधरा ते विस दिवसांत सुमारे 5 ते 6एकर शिवारातील ऊस खोडवा पीक गव्यांकडून फस्त झाले आहे. यामुळे शेती करायची की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.वाढती महागाई, मजुरांचा वाढताखर्च, गगनाला भिडलेले खतांचे दर, शेतीपूरक औजारांचे वाढीव दर, मजुरांचा तुटवडा आणि त्यात असमानी संकट अशा गर्तेत अडकलेल्या बळीराजावर आता या वन्य प्राण्यांचे संकट ओढावले आहे.
    .

बाबुराव बुडके यांच्या घराशेजारी गडहिंग्लजच्या श्रीपतराव शिंदे शिक्षण समूहाची बस लावण्यात आली होती. सकाळी तीनच्या सुमारास हत्तीने ती बस उलटी करून बाहेर फेकली गेली. यामध्ये स्कुल बसचे नुकसान झाले आहे तर अनिल निकम यांची ओमनी कार काजू फॅक्टरीशेजारी उभी केली होती. तिची काच पाठीमागून फोडली.
 

गेले दहा ते पंधरा दिवस शेतात असलेले पाईपलाईन, पाण्याची टाकी, केळी, काजूच्या झाडांचे, खोडवा ऊस पिकाचे नुकसान हत्तीकडून होत आहे.
 

*फिरत्या पथकाला चकवा
वन विभागाचे फिरते पथक रात्रीचे गस्त घालत असते. फिरत्या पथकाला चकवा देऊन हत्तीने स्कूल बस व ओमणी गाडीचे नुकसान केले. त्यामुळे फिरते पथक कुठे असते? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

 

दरम्यान, दहा दिवसांपूर्वीही दशरथ येलगार यांच्या शेडशेजारी उभ्या केलेल्या बैलगाडीचे नुकसान केले होते. तसेच या अगोदरही सिरसंगी गावाजवळील गावाबुडी या नावाने असणाऱ्या शेतातील विजय बाजीराव देसाई, किशोर देसाई, गणेश देसाई, दत्तात्रय गुरव आदींच्या खोडवा ऊस पिकाचे शेतात लोळून नुकसान केले होते.दररोजचे होणारे पिकांचे नुकसान व वन विभागाकडून मिळणारी तुटपुंजी नुकसानभरपाई यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. वन विभागाने आमची शेतीच भाडेतत्त्वावर घ्यावी व आमचे पालनपोषण करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.सातेवाडी भागात तर विनाखंड शेती कसायला देण्यास तयार आहेत परंतु कोणी घ्यायला तयार नाहीत अशी खदखद मंगेश पोतनीस यांनी बोलून दाखवली.
     

शासनाने तसेच वनखत्याने योग्य नुकसान भरपाई  देऊन  वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी व नागरिकांतून होत आहे.


*स्कूल बस उलटली, कारची काच फोडली-सिरसंगीत गजराजाचे कारनामे
Total Views: 405