बातम्या
पशु आरोग्य, लसीकरण व मार्गदर्शनपर चर्चासत्र कार्यक्रम उत्साहात संपन्न
By nisha patil - 8/21/2026 7:32:20 PM
Share This News:
पशु आरोग्य, लसीकरण व मार्गदर्शनपर चर्चासत्र कार्यक्रम उत्साहात संपन्न
आजरा(हसन तकीलदार) महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा , पाणी फाउंडेशन फार्मर कप 2026 आणि "भावेश्वरी शेतकरी गट ,सुलगाव" यांच्या संयुक्त विद्यमाने सुलगाव तालुका आजरा येथे दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी पशु आरोग्य शिबिर लसीकरण , मार्गदर्शनपर चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधीरभाऊ देसाई (जिल्हा परिषद सदस्य,कोल्हापूर )हे होते.
शिरीष देसाई ( जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर),रणजीत देसाई जनता बँक (संचालक, आजरा साखर कारखाना),युवराज पवार, पांडुरंग खवरे (सरपंच,ग्रामपंचायत सुलगाव),सदानंद कदम (उपसरपंच ग्रामपंचायत सुलगाव), नंदिनी डोंगरे,वसंत देसाई (माजी सरपंच व भावेश्वरी सेवा संस्था, सुलगाव चेअरमन), मारुती कदम( शंभू महादेव दूध संस्था, सुलगाव चेअरमन), नंदकुमार देसाई (वारणा दूध संस्था, सुलगाव चेअरमन), सौ. अंजना अनिल देसाई (धनलक्ष्मी दूध संस्था , सुलगाव चेअरमन), संदीप खवरे , किरण पाटील (उपविभागीय कृषी अधिकारी,गडिंग्लज) भूषण पाटील (तालुका कृषी अधिकारी, आजरा), मंडळ कृषी अधिकारी, उत्तुर मोहन फुले, उप कृषी अधिकारी प्रकाश पाटील , सतीश कुंभार हे प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून विधिवत पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भारतीय संस्कृतीत आणि जीवनात 'गोमाता' म्हणून अत्यंत पवित्र व पूज्य स्थान असलेल्या गाईंची खणा नारळाने ओटी भावेश्वरी शेतकरी गट सुलगाव येथील सर्व महिला भगिनींनी भरून व गाईंना पुरणपोळीचा नैवेद्य देऊन लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात केली. सुधीरभाऊ देसाई यांनी शेतकऱ्यांचा शेतीसोबत जोडधंदा म्हणून जनावरांचे महत्त्व अधोरेखित केले.जनावरांच्या आरोग्य अबाधित राखल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होऊ शकते.त्याचप्रमाणे भावेश्वरी शेतकरी गट सुलगावचे कार्य खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे
म्हणून कौतुक केले. त्यानंतर शिरीष देसाई यांनी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेऊन जास्तीत जास्त योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देण्याचे त्यांनी आवाहन केले.फार्मर कप स्पर्धेमध्ये भावेश्वरी गट वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवते हे कौतुकास्पद आहे असे गौरवोदगार काढले आणि सुलगावसाठी पाच लाखाचा विकास कामासाठी निधीही जाहीर केला . गटांनी केलेल्या कार्याचे व्हिडिओ दाखवण्यात आले. व्हिडीओ चित्रीकरण पहिल्यानंतर ते कौतुकास्पद वाटले . त्यानंतर गटातील सर्व महिला मंडळींनी पशुसंवर्धन शिबिर या संदर्भामध्ये एक सुंदर समूह गीत सादर केले. त्यानंतर अक्षय अवताडे (पशुविकास अधिकारी,भादवण) यांनी जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन, गोठा व्यवस्थापन, मुरघास तयार करण्याची पद्धत,लसीकरणाबाबत विविध उपायोजना याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर व योग्य मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील यांनी पाणी फाउंडेशन फार्मर कप 2026 च्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती प्रत्यक्ष गटातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन घेतली व त्यांना स्पर्धेच्या दृष्टिकोनातून सुधारणा करण्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.प्रकाश पाटील यांनी भात पिकावरील कीड आणि रोग आणि त्यावरील उपाय योजना याचे मार्गदर्शन केले.
भावेश्वरी शेतकरी गटाच्या अध्यक्षा सौ. विजया वर्देकर यांनी गटामध्ये चालू असलेली उपक्रम आणि जैविक दशपर्णी अर्क , जीवामृत तयार करून त्याची फवारणी आळवणी प्रत्यक्ष केली. कामगंध सापळे, चिकट सापळे , पक्षी थांबे हे आम्ही शेतामध्ये इर्जीक ने बनवून लावले आहेत . तसेच गटातील सर्व सदस्यांनी एकत्र निविष्ठा खरेदी केल्यामुळे आम्हाला आर्थिक बचत झाली . डिजिटल शेतीशाळा आणि पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे शेतीमध्ये उत्पादन वाढेल आणि फार्मर कप स्पर्धा 2026 स्पर्धा आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त केला . मेंटर तथा सहाय्यक कृषी अधिकारी सौ.मनिषा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. व गावातील शेतकरी अनिल देसाई यांनी सुलगावच्या भावेश्वरी शेतकरी गट कार्याचे कौतुक केले आणि सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित शेतकरी यांचे आभार मानले, सदर पशुसंवर्धन शिबिर लसीकरण चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन भावेश्वरी शेतकरी गट, सुलगाव मधील गटाचे निमंत्रक विश्वास देसाई , निमंत्रक ओंकार खवरे , निमंत्रक संजय डोंगरे आणि गटातील सर्व सदस्य आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अगदी उत्कृष्ट केले होते.
पशु आरोग्य, लसीकरण व मार्गदर्शनपर चर्चासत्र कार्यक्रम उत्साहात संपन्न
|