बातम्या

शाहूवाडीच्या राजकारणातील ‘संजीवनी’ हरपली; राज्यातील पहिल्या ईव्हीएम महिला आमदारांचे निधन

Shahuwadi politics loses its Sanjeevani


By nisha patil - 8/18/2026 3:14:00 PM
Share This News:



शाहूवाडीच्या राजकारणातील ‘संजीवनी’ हरपली; राज्यातील पहिल्या ईव्हीएम महिला आमदारांचे निधन

शाहूवाडीच्या माजी आमदार आणि गोकुळच्या संचालिका संजीवनीदेवी संजयसिंह गायकवाड (वय ७१) यांचे आज सकाळी साडेआठच्या सुमारास निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

नागाळा पार्क येथील निवासस्थानातून त्यांचे पार्थिव पंचगंगा घाटावरील जुन्या वाड्यात नेण्यात आले. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संजीवनीदेवी गायकवाड यांच्या नावाची राज्यातील मतदान यंत्रावर झालेल्या पहिल्या विधानसभा पोटनिवडणुकीतील पहिल्या महिला आमदार म्हणून नोंद आहे. पती माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांच्या निधनानंतर २००० मध्ये शाहूवाडी मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती.

३ ऑक्टोबर २००० रोजी झालेल्या निकालात संजीवनीदेवींनी ४ हजार १२१ मताधिक्याने विजय मिळवला. या निवडणुकीत राज्यात पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात आला होता. त्यांच्या निधनाने शाहूवाडीच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण पर्व आणि गोकुळच्या सहकार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व हरपले आहे.


शाहूवाडीच्या राजकारणातील ‘संजीवनी’ हरपली; राज्यातील पहिल्या ईव्हीएम महिला आमदारांचे निधन
Total Views: 6