बातम्या
साळगाव ता. आजरा येथे शेख व शिप्पूरकर यांचा सत्कार
By nisha patil - 4/9/2026 3:14:56 PM
Share This News:
साळगाव ता. आजरा येथे शेख व शिप्पूरकर यांचा सत्कार
*आजरा(हसन तकीलदार):-आजरा तालुक्यातील साळगाव येथील शाहरुख रजाक शेख यांची वनरक्षक म्हणून वनखात्यात नियुक्ती झालेबद्दल व पांडुरंग महादेव शिप्पूरकर यांची 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापक पदावर असताना सेवा निवृत्ती झालेबद्दल या दोघांचा सत्कार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )यांचेतर्फे करण्यात आला.
रजाक बापू शेख हे वनविभागामध्ये कार्यरत असताना त्यांचे अपघाती निधन झाले होते. आपल्या वडिलांच्या खात्यातच आपण सेवा करणार या हेतूने शाहरुख रजाक शेख हे वनखात्यात रोजंदारीवर काम करीत होते. त्यानुसार आता त्यांची रीतसर वनरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाटणे कोदाळी ता. चंदगड येथे ते आता वनरक्षक म्हणून सेवेत रुजू झाले आहेत. यासाठी वनखात्यातील अधिकारी व सहकाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले असे त्यांनी सांगितले.
तर पांडुरंग महादेव शिप्पूरकर हे 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापक पदावर काम करीत असताना सेवानिवृत्त झाले. धमापूर ता. चंदगड येथील शाळेतून सेवेला सुरवात केली. या दुर्गम गावात 1992 साली ते रुजू झाले त्यानंतर आजरा येथील देवर्डे गावात त्यांनी जास्त काळ सेवा दिली. या सेवा कालावधीत त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. डेप्युटी कलेक्टर, सी. ए, लंडन मध्ये संशोधक, जी. एस. टी. अधिकारी, आरोग्य अधिकारी अशा विविध उच्चपदावर त्यांचे विद्यार्थी सद्या कार्यरत आहेत. चित्रकला, शिल्पकला, नृत्यकला, हार्मोनियम वादन तसेच इंग्रजी विषयामध्ये एम. ए. केलेल्या या शिक्षकाने विविध क्षेत्रातील विद्यार्थी घडवले आहेत.
खडू चित्रामध्ये त्यांचा खास हातखंडा आहे. या क्षेत्रातले कोणतेही प्रशिक्षण न करता त्यांनी ही कला आत्मसात केली आहे हे वैशिष्ट आहे. मराठी विद्यामंदिर मौजे कारवे ता. चंदगड येथून मुख्याध्यापक पदावरून ते आता सेवा निवृत्त झाले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, तब्ब्ल 34 वर्षे मी शिक्षक म्हणून दिलेल्या सेवेला आज स्वल्पविराम मिळाला आहे. स्वल्पविराम या अर्थाने कारण या पुढेही मला ज्ञानदानाचे कार्य अखंडपणे पुढे चालू ठेवण्याचा माझा मानस आहे.
सत्कारावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उप जिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, दयानंद भोपळे,बिलाल लतीफ, शिवाजी केसरकर, लक्ष्मण माडभगत, महादेव पोवार, रोहित शेंडे, आनंदा कुंभार (साळगाव) आदिजण उपस्थित होते.
साळगाव ता. आजरा येथे शेख व शिप्पूरकर यांचा सत्कार
|