बातम्या
शक्तीपीठ विरोधी मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन
By nisha patil - 10/4/2026 6:20:08 PM
Share This News:
**शक्तीपीठ विरोधी मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन*
*दि. 15 एप्रिल 2026 रोजी शक्तिपीठ मेळाव्याचे आयोजन*
**आजरा(हसन तकीलदार)*:-शक्तीपीठ महामार्ग हा आजरा तालुक्यातील १०ते ११ गावांच्या मधून जात असून शेतकऱ्यांच्या शेतीबरोबरच येथील पर्यावरण आणि सांस्कृतिक जीवनही उध्वस्त करणारे आहे. त्यामुळे शक्तीपीठच्या विरोधातील लढाईत आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले.
यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले की,१५ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, आम.सतेज उर्फ बंटी पाटील,माजी आम. राजेश पाटील यांच्या उपस्थितीत आजरा येथे शक्तिपीठ विरोधी शेतकऱ्यांचा मेळावा होत आहे. हा मेळावा आपण सर्वजण मिळून यशस्वी करूया.
खरंतर शक्तीपीठ असे नाव देऊन लोकांच्या धार्मिक भावनेशी खेळण्याचा हा प्रकार आहे. सरकारला शक्तीपीठाच्या नावाखाली भांडवलदार आणि बड्या व्यापाऱ्यांसाठी हा रस्ता बनवायचा आहे. केवळ अदानी आणि अंबानीचे हित डोळ्यासमोर ठेवून होणाऱ्या या रस्त्याला आमचा तीव्र विरोध आहे कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता करू द्यायचा नाही असा निर्धार या मेळाव्यात होणार आहे.
मेळाव्याच्या तयारीसाठी गावोगावी बैठका सभा होत असून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सभा बैठकांना मिळत आहे त्यामुळे हा मेळावा मोठ्या संख्येने यशस्वी होणार याची आम्हाला खात्री आहे.
खरंतर या रस्त्याची मागणी कोणत्याही शेतकऱ्याने केली नसल्याने हा रस्ता गरजेचा नाही. खरंतर या रस्त्याला अन्य पर्यायी अनेक रस्ते असताना देखील शक्तीपीठ चा अट्टाहास कशासाठी?असा आमचा सरकारला सवाल आहे.
शेती, पर्यावरण आणि इथली लोकाभिमुख संस्कृती वाचवण्यासाठी शक्तीपीठ लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. म्हणूनच तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले की, देवाच्या आणि भक्तांच्या नावावर केवळ वेगळं वातावरण तयार करून हा शक्तिपीठ महामार्ग सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करण्याचे कारस्थान आहे. हरपवडे, येरंडोळ येथून चंदगड पर्यंत हा मार्ग जाणार आणि या पट्ट्यामध्ये बागायती शेतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे येथील शेती उध्वस्त होऊन याचा परिणाम साखर कारखान्यावर होणार आहे. पर्यावरण रहावा, शेतकरी उध्वस्त होऊ नये, उद्योगपतींच्या अस्तित्वासाठी निर्माण करीत असलेला हा शक्तिपीठ हाणून पडायचा म्हणून गावागावातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून हा मेळावा घेणार आहोत.
प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले की, पात्रादेवी हे काय मोठे देवस्थान नाही सुधारित शक्तिपीठाचे नवीन मार्ग येतोय आणि त्यामधून आजरा, राधानगरी आणि चंदगड या तालुक्यातील अतिशय निसर्ग संपन्न शेती बाधित होणार यासाठी याला विरोध करणे गरजेचे आहे. समृद्धी महामार्ग पाहिलं तर आजूबाजूच्या लोकांना आत येता जाता येत नाही एवढे मोठे भराव आहेत. भरावासाठी मोठमोठे डोंगर भुईसपाट केले जात आहेत निसर्गातील जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. माझं घर एका बाजूला आणि शेती एका बाजूला अशी विचित्र परिस्थिती होणार आहे. त्याच्यामुळे शेती आणि पर्यावरण धोक्यात येणार आहे. दोन्ही समितीनी सांगितले आहे की, जैवीक विविधता टिकली पाहिजे, पशु पक्षी जगले पाहिजे. कागलचा भाग वगळला परंतु राधानगरीचा निसर्गसंपन्न भाग या शक्तिपीठामध्ये भरडला जाणार आहे. विरोध हे लोकशाहीमधले फार मोठे हत्यार आहे. ज्यावेळी जनता विरोध करते, लोकं रस्त्यावर उतरतात त्यावेळी सरकारला याची नोंद घ्यावी लागते. ना फायदा होणार ना रोजगार मिळणार मग या शक्तिपिठाचा अट्टाहास कशासाठी? येत्या 15 तारखेला मेळावा घेणार आहोत या मेळाव्याला लोकांमध्ये जागरूकता व्हावी यासाठी सर्वांनी काम करावे.
यावेळी कॉ. संजय तर्डेकर, उबाठाचे युवराज पोवार, डॉ. धनाजी राणे,कॉ. प्रकाश मोरूस्कर, युवराज जाधव, संजयभाऊ सावंत, कृष्णा सावंत, रवींद्र भाटले आदिजण उपस्थित होते.
शक्तीपीठ विरोधी मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन
|