बातम्या

शहाजी महाविद्यालयात "सुदृढ निरोगी समाज: राष्ट्र उभारणीचा मुलाधार" या विषयावर शिवाजी विद्यापीठ अग्रणी कार्यशाळा संपन्न

Shivaji Universitys flagship workshop


By nisha patil - 2/2/2026 3:35:32 PM
Share This News:



शहाजी महाविद्यालयात "सुदृढ निरोगी समाज: राष्ट्र उभारणीचा मुलाधार" या विषयावर शिवाजी विद्यापीठ अग्रणी कार्यशाळा संपन्न.

सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी चांगला आहार, विहार, विचार, व्यायाम व आचरणाला प्राधान्य द्या: डॉ

कोल्हापूर: सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी चांगला आहार, विहार, विचार, व्यायाम व आचरणाला प्राधान्य द्या.त्यातूनच तुमचे शरीर, कुटुंब आणि समाज चांगला बनेल असा विश्वास  प्रसिद्ध आरोग्य तज्ञ डॉ. संदीप पाटील यांनी व्यक्त केला. 
   

दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजना, न्यू  कॉलेज क्लस्टर अंतर्गत एक दिवशीय अग्रणी कार्यशाळा संपन्न झाली.  त्यातील बीज भाषण प्रसंगी ते बोलत होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण अध्यक्षस्थानी होते .
 

प्रारंभी वृक्षाला जल अर्पण करून  कार्यशाळेचे उद्घाटन झाले. 
  डॉ संदीप पाटील म्हणाले, चुकीचा आहार, जंक फूड खाल्ल्याने, चांगल्या ठिकाणचा विहार टाळल्याने, वाईट विचार केल्याने, व्यायामाचा अभाव असल्याने व आपले आचरण चांगले नसल्याने माणसाला अनेक रोग जडले आहेत. तंबाखू व इतर मादक पदार्थाकडे  जनावरे पहात नाहीत,वासही घेत नसल्याचे दिसते.मात्र माणूस तो आपल्या पोटामध्ये शरीरामध्ये ढकलतो. माणसाने स्वतःसाठी, व्यायामासाठी   एक तास वेळ दिलाच पाहिजे.  रात्री दहा ते पहाटे चार पर्यंतची झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे. चांगली झोप झाली तर चांगला दिवस तुमचा जातो. मोबाईल, टीव्ही, इंटरनेट यांचा तासभरच फक्त उपयोग करा.त्यापासून जेवढे जास्त दूर राहता येईल तेवढे राहा. 
   

ते म्हणाले,पूर्वी माणसं घरी जेवण करायची आणि शौचाला बाहेर जायची.आज उलटे झाले आहे. हॉटेलमध्ये जेवण करतात आणि घरी शौचालयास येतात. आपली दिनचर्या निसर्गाप्रमाणे पाहिजे.लठ्ठपणामुळे 45 आजार  होतात. शरीराला कार्बोहायड्रेट पेक्षा प्रोटीनची गरज जास्त आहे. त्यासाठी भाकरी, मिलेट, डाळी, कडधान्ये, काकडी, गाजर, बीट, मुळा यांचे सॅलेड याला प्राधान्य द्या. विषमुक्त आहार घ्या. आपले आचरण चारित्र्य चांगले ठेवा. यातूनच चांगला समाज घडणार आहे आणि तोच खरा राष्ट्राचा मुलाधार आहे. एखादी कला,संगीत, गाणे याकडे माणसाने कल ठेवला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
   

डॉ. शशिकांत पाटील यांनी "व्यसनमुक्त समाज" यावर विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. व्यसनाधीनतेमुळे व्यक्ती व्याधीग्रस्त बनते. त्याचे कुटुंब भरडले जाते. समाजाचेही यामध्ये नुकसान होते. 
 

 डॉ.प्रसाद सनगर यांनी "ध्यान, आहार, मानसिक आरोग्य"  याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ध्यानासाठी दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही.डोळे मिटून श्वासावर नियंत्रण ठेवले की मिनिटाभरात तुमची ध्यान धरण होते. शांत चित्त, शांत मन, चांगले विचार,चांगले आचरण याला लोकांनी प्राधान्य दिले पाहिजे. पैसा हे जगण्याचे साधन आहे. त्याच्या मागे न लागता आपला दैनंदिन आनंद शोधला पाहिजे. 
   

या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. विजय देठे यांनी कार्यशाळेचे  स्वागत व प्रास्ताविक  केले. प्रा. संतोष कांबळे यांनी आभार मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभम पाटील यांनी केले.
 आरोग्य या विषयावरती     विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भिंती पत्रकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन  झाले. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन, श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या कार्यशाळेस प्रोत्साहन मिळाले. 
 

डॉ. आर.डी.मांडणीकर, डॉ. डी. के. वळवी, डॉ.पांडुरंग पाटील, डॉ. सुनिता राठोड,  प्रबंधक आर जे भोसले, अधिक्षक एम .व्ही.भोसले, डॉ संदीप पाटील, कोल्हापुरातील 14 महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.  महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. विजय देठे व प्रा.संतोष कांबळे यांनी  या कार्यशाळेचे संयोजन केले.


शहाजी महाविद्यालयात "सुदृढ निरोगी समाज: राष्ट्र उभारणीचा मुलाधार" या विषयावर शिवाजी विद्यापीठ अग्रणी कार्यशाळा संपन्न
Total Views: 17