बातम्या
शिवसेनेत निष्ठेला योग्य न्याय; पक्षनेतृत्वावर कोणीही शंका घेवू नये : आमदार राजेश क्षीरसागर
By nisha patil - 4/15/2026 3:17:13 PM
Share This News:
शिवसेनेत निष्ठेला योग्य न्याय; पक्षनेतृत्वावर कोणीही शंका घेवू नये : आमदार राजेश क्षीरसागर*
पदाधिकारी बैठकीत शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना आवाहन
कोल्हापूर दि.१५ : १९८६ पासून गेली ४० वर्षे शिवसेनेत एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणे काम केले. पण, मंत्री पदाची संधी अजून मिळाली नाही. परंतु, नाराज न होता किंवा पक्षनेतृत्वावर कोणतीही टीका- टिपण्णी न करता आजही शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतुत्वाशी एकनिष्ठ राहून काम करत आहे.
शिवसेनेच्या जडणघडणीत जेष्ठ शिवसैनिकांचे मोठे योगदान असून, त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य न्याय देतील. त्यामुळे पक्षनेतृत्वावर कोणीही शंका घेवू नये. शिवसेनेत निष्ठेला योग्य न्याय मिळतो, अशी भावना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे बी.एल.ओ. नेमणूकीसंदर्भात आज पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक पार पडली या दरम्यान ते बोलत होते.
बैठकीच्या सुरवातीस बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले, गेली ४० वर्षे आम्ही शिवसेनेचे प्रामाणिकपणे काम केले आहे. पण, नंतर आलेली काही लोक पक्षनेतृत्वावर शंका उपस्थित करून शिवसेनेतील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेना पक्षवाढीसाठी एक पाऊल मागे घेण्याची भूमिका नेहमीच शिवसैनिकांची राहिली आहे. पण, डावलले जात असल्याची भावना काही नवख्या पदाधिकाऱ्यांकडून होत असल्याने शिवसैनिकांत संभ्रम निर्माण होत आहे. महापालिका निवडणुकीतही शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्याचा उद्देश ठेवून अनेक सक्षम पदाधिकाऱ्यांनी हक्क असूनही माघार घेतली. महापालिका निवडणुकीत शिवसैनिकांऐवजी नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली. याची खंत शिवसैनिकांच्या मनात आहे. शिवसैनिक न्यायाच्या प्रतीक्षेत असतानाही काही पदाधिकारी पक्षनेतृत्वावर शंका उपस्थित करून, एकप्रकारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात. ही पद्धत चुकीची असून, पक्षाच्या अस्मितेला गालबोट लागण्याचा हा प्रकार आहे. कोल्हापूर शहराला मंत्री पद मिळावे ही तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे. तशी मागणीही वारंवार केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती करण्यासाठी पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्या रूपाने मंत्रीपद दिले गेले. परंतु, शहर आजही मंत्री पदापासून वंचित आहे. इतर जिल्ह्यात पक्षाचे दोन – दोन मंत्री आहेत. त्याप्रमाणे कोल्हापुरातही पक्षाने दुसरे मंत्रीपद द्यावे, अशी भावना सर्वच शिवसैनिकांची असल्याचे मत व्यक्त केले.
यानंतर बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्तुत्ववान नेतृत्व आहे. ते सर्वांना न्याय देणारेच आहेत. शहरातील वातावरणावर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तयार होते हे सत्य आहे.
गेली ४० वर्षे एकनिष्ठपणे आपण सर्वांनी मिळून काम केले आहे. ४० वर्षापूर्वीचा काळ बघितला तर ग्रामीण भागात शिवसेनेचा बोर्ड लावल्याक्षणी काढला जायचा. या संघर्षाच्या काळात स्वर्गीय रामभाऊदादा चव्हाण, शिवाजीराव जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, चंदूभाऊ साळोखे, विनायक साळोखे अशा कट्टर शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेचे रोपटे रोवले गेले. पक्षासाठी अंगावर गुन्हे घेणारे कार्यकर्ते फक्त शिवसेनेतच दिसतील.
याच रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. त्यामुळे जेष्ठ शिवसैनिकांचे पक्षासाठी असलेले योगदान डावलता येणार नाही. मा.एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना वाचविण्यासाठी उठाव केला त्या पहिल्या दिवसापासून आपण सर्वजण एकत्र येवून मा.शिंदे साहेबांच्या पाठीशी ठाम उभे राहिला आहे. त्याप्रसंगी घरावर मोर्चे निघण्याचीही पर्वा कोणी केली नाही.
त्यानंतर पक्षनेतृत्वाने दिलेले सर्व मेळावे, सभा, अधिवेशन, शासनाचे उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात मोलाचे योगदान दिले. पक्षाला जनाधार मिळाल्याचे चित्र निर्माण झाल्यानंतर काहीजण अंदाज घेवून पक्षात आले. पण, जेष्ठ आणि निष्टावंत शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहेत.
शिवसेनेच्या वाढीमध्ये योगदान दिलेल्या प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाचा विविध पदांवर पहिला हक्क आहे. त्यामुळे निष्ठावंताना न्याय देण्याची भूमिका आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडणार आहे.
मंत्री पद मिळाले नाही म्हणून मी कधीच पक्षनेतृत्वावर शंका घेतली नाही आणि घेणारही नाही. कारण शिवसेनेत निष्ठेला योग्य न्याय मिळतो. नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची कार्यपद्धती अवलंबणे गरजेचे आहे. नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच महापालिका निवडणुकीत झाला आहे. पण त्यांनीही संयम ठेवणे गरजेचे आहे. पक्षाची बदनामी होईल असे कोणतेही वक्तव्य करू नये. महापालिका निवडणुकीत काळजावर दगड ठेवून काही निर्णय घ्यावे लागले. पण, निकालानंतर ते निर्णय योग्य असल्याचे दिसून आले आहे.
ज्या ज्या शिवसैनिकांनी निवडणुकीत हक्काचा त्याग केला त्या सर्व शिवसैनिकांना येणाऱ्या काळात विविध महामंडळे, समित्यांवर सन्मानपूर्वक स्थान देण्यात येईल. विधानसभा निवडणुकीत पेठांनी सुमारे ५० हजारांचे मताधिक्य दिले आणि विजयात मोलाची भूमिका बजावली. महापालिका निवडणुकीतही दोन - तीन ठिकाणी वगळता सर्व ठिकाणी महायुतीच्याच उमेवाराना पेठांमधील जनतेने विजयी केले. ही मी केलेल्या कामाची पोहच पावती असून, शिवसेनेवरील विश्वास आहे.
त्यामुळे कोल्हापूर शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध होते. गेल्या अडीच वर्षाच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कोट्यावधी रुपयांचा निधी शहराला दिला. त्यामुळे त्यांचे विशेष असे प्रेम कोल्हापूरवर आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराला आणि शिवसैनिकांना ते योग्य न्याय देतील यात शंका नाही.
पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचीही भूमिका अत्यंत महत्वाची असून, त्यांनी शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी योग्य निर्णय घेतले पाहिजेत. जेणेकरून खदखद निर्माण होणार नाही.
नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी संयम ठेवावा. जुना- नव्या पदाधिकाऱ्यांनी मिळून शिवसेना एक कुटुंब असल्याची भागणा ठेवावी. कोणीही विचलित होवू नये. शिवसेनेत निष्ठेला योग्य न्याय मिळतो. त्यामुळे पक्षनेतृत्वावर कोणीही शंका घेवू नये, असे आवाहन केले.
यावेळी महानगरप्रमुख शिवाजीराव जाधव, शहरप्रमुख रणजित जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, संजय गांधी निराधार योजना शहरअध्यक्ष दीपक चव्हाण, परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, पूजा भोर, पूजा कामते, जिल्हा समन्वयक कमलाकर जगदाळे, सुनील जाधव, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, अनुसूचित जाती जमाती जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, अंकुश निपाणीकर, रिक्षासेना शहरप्रमुख राजू पवार, आदर्श जाधव, सचिन क्षीरसागर, अर्जुन संकपाळ, सौरभ कुलकर्णी, धैर्यशील जाधव, नितीन मुधाळे, विनोद हजारे आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेत निष्ठेला योग्य न्याय; पक्षनेतृत्वावर कोणीही शंका घेवू नये : आमदार राजेश क्षीरसागर
|