बातम्या
धक्कादायक! निवासी क्रीडा प्रशालेत उंदरांचा हैदोस; चार दिवसांत सहा विद्यार्थिनींना चावा
By nisha patil - 7/20/2026 12:03:44 PM
Share This News:
धक्कादायक! निवासी क्रीडा प्रशालेत उंदरांचा हैदोस; चार दिवसांत सहा विद्यार्थिनींना चावा
शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशालेतील प्रकार
पालकांमध्ये संताप, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
कोल्हापूर - शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशालेत विद्यार्थिनींना उंदीर चावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल सहा विद्यार्थिनींना उंदरांनी चावा घेतल्याची माहिती समोर आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उंदरांच्या चाव्यामुळे जखमी झालेल्या सर्व विद्यार्थिनींवर सीपीआर रुग्णालयात तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली नाही. मुख्याध्यापक अतुल देवकर यांनी विद्यार्थिनींवर आवश्यक औषधोपचार सुरू असल्याची माहिती दिली.या घटनेनंतर निवासी वसतिगृहातील स्वच्छता, उंदरांचा वाढता उपद्रव आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी उंदरांचा वावर कसा वाढला, त्यावर आतापर्यंत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आणि पुढे अशा घटना टाळण्यासाठी काय पावले उचलली जाणार, याबाबत पालकांकडून स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, संबंधित यंत्रणांनी वसतिगृहाची तातडीने पाहणी करून उंदरांचा बंदोबस्त करावा, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
धक्कादायक! निवासी क्रीडा प्रशालेत उंदरांचा हैदोस; चार दिवसांत सहा विद्यार्थिनींना चावा
|