बातम्या
*साहेब आम्हाला तुमची नुकसान भरपाई नको पण हत्ती तेवढा घेऊन जावा -जयसिंग पाटील
By nisha patil - 7/20/2026 8:30:49 PM
Share This News:
*साहेब आम्हाला तुमची नुकसान भरपाई नको पण हत्ती तेवढा घेऊन जावा -जयसिंग पाटील
*आजरा(हसन तकीलदार):-गेली 19 वर्षे हत्तीचा वावर धनगरमोळा, घाटकरवाडी या पट्ट्यामध्ये आहे. जणू काही वास्तव्यास असल्यासारखा हा हत्ती आहे. हत्तीसाठी लाखो रुपये खर्च झाले असतील परंतु हत्ती हुसकावण्यात वनविभागाला यश आलेले नाही. या भागातील काजू झाडे, ऊस, मेसकाठ्या तसेच भातशेतीचे नुकसान केले आहे.तरीसुद्धा हत्तीवर उपाययोजना आखण्यात शासनाला यश आलेले नाही. हत्ती, गवे, बिबट्या, माकडे, रानडुकरे यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
काल दि. 19 जुलै 2026 रोजी रात्री चक्क घाटकरवाडी गावात हत्ती आल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. गेली दीड दोन महिने घाटकरवाडी गावामध्ये हत्ती वास्तव्यास आहे. ऊसाची,काजू झाडांची आणि मेसकाठ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. ऊस, भातशेतीचे नुकसान करून गावातील परड्यात असणारी केळी आणि मेसकाठी यांचे नुकसान करीत हत्ती बिनधास्त गावातून परेड करत आहे. यावेळी बोलताना घाटकरवाडीचे जयसिंग पाटील म्हणाले की, जवळ जवळ 19 वर्षे झाली या भागात हत्तीने तळ ठोकला आहे. मागील दीड महिन्यापासून हत्ती गावामध्ये वास्तव्यास आहे. अर्धा एक तास वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी येऊन जातात नंतर रात्रभर हत्तीचा धुमाकूळ गावामध्ये सुरूच असतो. या हत्तीसाठी अंदाजे पाच सहा कोटी खर्च झाले असतील परंतु हत्ती पकडणे वनविभागाला शक्य झालेले नाही आणि त्यांनी तो प्रयत्नही केलेला नाही. आमची एकच मागणी आहे आम्हाला तुमची नुकसान भरपाई नको फक्त हत्ती तेवढा घेऊन जावा.असे पाटील यांनी सांगितले
घाटकरवाडीचे गंगाराम डेळेकर आपली व्यथा मांडताना म्हणाले की, गेली 15 ते 20 वर्षे आमच्या गावात हत्ती नुकसान करीत आहे. लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. ते तात्पुरता येतात मलमपट्टी लावून जातात. त्यांनी हा हत्ती वनताराला द्यावे आणि आमची सुटका करावी. वन्यप्राण्यांना कंटाळून शेतकरी जलसमाधी घेण्याच्या तयारीत आहेत. वनकर्मचारी आपल्या पद्धतीने काम करतात परंतु त्यांनाही काही मर्यादा आहेत. आम्ही ऊस पीक लावतो. बाजारभावाप्रमाणे आम्हाला एकरी 1 लाख 20 हजार प्रमाणे नुकसान भरपाई सरकारने द्यावी,आम्ही सगळी पिके वन्यप्राण्यांना सोडून देतो अशी त्यांनी मनातील भडास व्यक्त केली.
*साहेब आम्हाला तुमची नुकसान भरपाई नको पण हत्ती तेवढा घेऊन जावा -जयसिंग पाटील
|