बातम्या

गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; सत्यम फाऊंडेशनकडून शैक्षणिक साहित्य वाटप

Smiles light up the faces of needy students


By nisha patil - 11/9/2026 3:27:02 PM
Share This News:



गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; सत्यम फाऊंडेशनकडून शैक्षणिक साहित्य वाटप

शाहूपुरी येथील वी. स. खांडेकर प्रशालेत सत्यम फाऊंडेशनच्या वतीने होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या, स्केचपेन, कंपास, इंग्लिश स्पीकिंग बुक, ड्रॉइंग बुक, पट्टी, खोडरबर यांसह विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी सत्यम फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा प्रतीक शिंदे यांनी उपस्थितांसमोर मांडला. फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या प्लेट डोनेशन, रक्तदान शिबिर, कोल्हापूर व केरळमधील महापुराच्या काळातील मदत, शिष्यवृत्ती तसेच महाराष्ट्रभर करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य वाटप या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उमा जाधव यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच एकमेकांना मदत करण्याची भावना जोपासावी, तसेच नवीन कौशल्ये आत्मसात करून अभ्यासात नैपुण्य मिळवावे, असे आवाहन प्रियंका पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या आत्मसंरक्षणासह विविध प्रकारची शिबिरे भविष्यात सत्यम फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक रणधीर मिरजकर, पर्यवेक्षक अनिल चव्हाण, जिमखाना प्रमुख लता पाटील, संस्थेचे सचिव भरत शास्त्री यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.


गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; सत्यम फाऊंडेशनकडून शैक्षणिक साहित्य वाटप
Total Views: 16