बातम्या
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाची दखल घ्या; 'वृक्षप्रेमी समूहा'चे तहसीलदार यांना निवेदन*
By nisha patil - 7/14/2026 6:27:02 PM
Share This News:
*-सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाची दखल घ्या; 'वृक्षप्रेमी समूहा'चे तहसीलदार यांना निवेदन*
**आजरा(हसन तकीलदार)*:-देशात लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडणाऱ्या नागरिकांच्या आवाजाची वेळीच दखल घेणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. नेमका हाच सूर आळवत, शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेले जागतिक कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करणारे निवेदन आज 'वृक्षप्रेमी समूहा'च्या वतीने पंतप्रधानांच्या नावे आजरा तहसीलदार यांना देण्यात आले.
वांगचूक यांच्या आंदोलनाचा आज सुमारे १५-१६ वा दिवस असून, त्यांची खालावणारी प्रकृती देशातील संवेदनशील नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.
तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात समूहाच्या वतीने अत्यंत परिपक्व आणि वैचारिक भूमिका मांडली आहे. आंदोलनातील मागण्या योग्य की अयोग्य या वादात न पडता, लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मूलभूत अधिकारांचा आदर राखला जावा, हाच या निवेदनाचा मुख्य हेतू आहे. सोनम वांगचूक हे केवळ एक आंदोलनकर्ते नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावणारे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. अशा संवेदनशील आणि जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त व्यक्तीच्या आरोग्याची हेळसांड होणे हे कोणत्याही लोकशाही राज्याला भूषणावह नाही, अशी स्पष्ट भूमिका नागरिकांनी यात घेतली आहे.
भारताने नेहमीच जागतिक स्तरावर लोकशाही मूल्यांची जपणूक करणारी एक महासत्ता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपले संपूर्ण जीवन पणाला लावून उपोषणासारखे टोकाचे पाऊल उचलते, तेव्हा त्यामागे एक ठाम वैचारिक अधिष्ठान असते. आपल्या देशाच्या संविधानाने आणि लोकशाही परंपरेने अशा शांततापूर्ण आंदोलनांना नेहमीच कायदेशीर व नैतिक पाठबळ दिले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या विषयाचे गांभीर्य ओळखून योग्य त्या उच्च पातळीवर सोनम वांगचूक यांच्याशी तातडीने चर्चा करावी आणि त्यांना हे उपोषण मागे घेण्यास प्रवृत्त करावे, अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
या संवेदनशील प्रकरणात प्रशासकीय पातळीवर होणारी दिरंगाई किंवा दुर्लक्ष हे लोकशाही तत्त्वांना तडा देणारे ठरू शकते, अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. देशाचे जबाबदार आणि सजग नागरिक या नात्याने, या गंभीर प्रसंगातून सरकारने समन्वयाने आणि सामंजस्याने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी आर्त साद या निवेदनाच्या माध्यमातून घालण्यात आली आहे.
हे निवेदन तहसीलदार यांना सुपूर्द करताना 'वृक्षप्रेमी समूहा'चे वृषाल आण्णा हूक्केरी, सुभाष विभुते, सौ. पुष्पलता घोळसे, डॉ. गौरी भोसले आणि विलास पोवार यांच्यासह परिसरातील इतर अनेक मान्यवर व सजग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाची दखल घ्या; 'वृक्षप्रेमी समूहा'चे तहसीलदार यांना निवेदन*
|