बातम्या
साऊथ झोन हॉकी स्पर्धेचा कोल्हापुरात दिमाखदार शुभारंभ; यजमान संजीवनची विजयी सुरुवात
By nisha patil - 9/9/2026 3:30:00 PM
Share This News:
साऊथ झोन हॉकी स्पर्धेचा कोल्हापुरात दिमाखदार शुभारंभ; यजमान संजीवनची विजयी सुरुवात
कोल्हापूर प्रतिनिधी, शहाबाज मुजावर मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुले-मुलींसाठी आयोजित साऊथ झोन हॉकी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात झाले.
महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, उपायुक्त किरणकुमार धनवडे, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, डेप्युटी डायरेक्टर सुहास पाटील आणि संजीवन समूहाचे चेअरमन पी. आर. भोसले यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
खेळाडूंच्या शिस्तबद्ध संचलनाने आणि संजीवनच्या संगीत विभागाच्या स्वागत गीताने उपस्थितांची मने जिंकली. प्रास्ताविकात पी. आर. भोसले यांनी संजीवनची तीन दशकांची वाटचाल सांगत, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग सांगून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचा संकल्प व्यक्त केला.
महापौर निकम यांनी संजीवनच्या कार्याचे कौतुक करत क्रीडा सुविधांसाठी मनपा सदैव सहकार्य करेल असे सांगितले. आयुक्त डॉ. भारूड यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय खेळाडू बनण्याचे स्वप्न पाहण्याचे आवाहन केले. हॉकीपटू आर्या देशमुख हिने खेळाडूंना क्रीडा शपथ दिली.
उद्घाटनानंतर झालेल्या १७ वर्षांखालील गटाच्या पहिल्या सामन्यात यजमान संजीवन पब्लिक स्कूलने डॉ. उल्हास पाटील स्कूल, भुसावळचा १ -० असा पराभव करत विजयी सलामी दिली.
साऊथ झोन हॉकी स्पर्धेचा कोल्हापुरात दिमाखदार शुभारंभ; यजमान संजीवनची विजयी सुरुवात
|