बातम्या
ईव्हीएम हटाओ, शिक्षा बचाओसाठी छत्रपती संभाजीनगरात राज्यस्तरीय आक्रोश महारॅली
By nisha patil - 2/9/2026 11:17:57 PM
Share This News:
ईव्हीएम हटाओ, शिक्षा बचाओसाठी छत्रपती संभाजीनगरात राज्यस्तरीय आक्रोश महारॅली
*आजरा(हसन तकीलदार)*:-ईव्हीएम मशीन, शिक्षणाचे वाढते खासगीकरण, शिक्षणविरोधी धोरणे, पेपरफुटी तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय आक्रोश महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षणाचे वाढते बाजारीकरण, सरकारी शाळा बंद होणे, शिक्षकांची अपुरी भरती, शिष्यवृत्ती व वसतिगृहांच्या समस्या, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांशी संबंधित विविध प्रश्नांवर या महारॅलीच्या माध्यमातून आवाज उठविण्यात येणार आहे.
या महारॅलीत ईव्हीएम हटवून बॅलेट पेपर लागू करावा, NEET/SSC/CGL सारख्या स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीविरोधात कठोर कारवाई करावी, NEP-2020 रद्द करावे, NTA मार्फत परीक्षा घेणे बंद करावे, सरकारी यंत्रणेमार्फत परीक्षा व भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, स्वाधार शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्ती महागाईच्या प्रमाणात वाढवून विद्यार्थ्यांच्या खात्यावर वितरित कराव्यात, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित PES सोसायटीअंतर्गत शाळा, कॉलेज व हॉस्टेलच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आदी मागण्या मांडण्यात येणार आहेत.
तसेच स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीविरोधात कठोर कायदा करावा, केंद्र व राज्य सरकारी विभागांमध्ये रिक्त पदांवर तात्काळ भरती करावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नियमित वसतिगृह प्रवेश द्यावा आणि शेड्युल्ड ट्राईब (आदिवासी विद्यार्थी) यांच्या प्रश्नांबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अशा विविध मागण्यांसाठी ही महारॅली आयोजित करण्यात आली आहे.
या राज्यस्तरीय आक्रोश महारॅलीस विद्यार्थी, युवक, पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हर्षवर्धन कांबळे, (भारतीय विद्यार्थी मोर्चा प्रचारक) यांनी केले आहे.
ईव्हीएम हटाओ, शिक्षा बचाओसाठी छत्रपती संभाजीनगरात राज्यस्तरीय आक्रोश महारॅली
|