बातम्या
शांतारामपंत वालावलकर हायस्कूलमध्ये विद्यार्थी बनले शिक्षक
By nisha patil - 7/9/2026 5:50:35 PM
Share This News:
शांतारामपंत वालावलकर हायस्कूलमध्ये विद्यार्थी बनले शिक्षक ; अध्यापनाचा घेतला सशक्त अनुभव
कोल्हापूर : मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित शांतारामपंत वालावलकर हायस्कूलमध्ये ११० विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनी शिक्षक होऊन शालेय कामकाज पाहिले . यावेळी संध्या पाटील हिने मुख्याध्यापिका होवून शालेय कामकाजाचा अनुभव घेतला . जय गडकरी याने उपमुख्याध्यापक होऊन प्रशासनास सहकार्य केले . शिक्षक झालेले विद्यार्थी शिक्षकदिना दिवशी पूर्णतः तयारीने आले होते .
अनेकांनी एकमेकांना सहाय्य करीत वर्गात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला . विद्यार्थी शिक्षिकांनी साडी तर विद्यार्थी शिक्षकांनी शोभेल असा शर्ट पँट परिधान केला होता .सर्व विद्यार्थी शिक्षक वेळेवर वर्गावरती जात घेतलेला घटक पूर्ण करताना दिसले . अपवाद वगळता सर्वांची तयारी उत्तम झालेली दिसून आली .विद्यार्थी मुख्याध्यापिका संध्या पाटील हिने विद्यमान मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांची प्रकट मुलाखत घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली .
शाळेच्या नियमीत वर्ग शिक्षकांनी नियंत्रकाची जबाबदारी पूर्ण केली . संयोजक समीर जमादार यांनी नवनिर्वाचित विद्यार्थी शिक्षकांचे वेळापत्रक बनवून त्यात अधिक सखोलता आणली . विद्यार्थी मुख्याध्यापिका संध्या पाटील, विद्यार्थी पर्यवेक्षिका तसेच उपमुख्याध्यापक जय गडकरी यांचा सत्कार मुख्याध्यापक संजय सौंदलगे, पर्यवेक्षिका सरिता शिंदे आणि राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला . सूत्रसंचालन सिद्धी कपिलेश्वरी यांनी केले . उपक्रम यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सागर वाडकर, संजीत सनगर, शीतल अलमान, जयवंत साखरे, प्रमोद कुलकर्णी, श्रीमती अनुपमा पन्हाळकर, श्रीमती भाग्यश्री गवाणकर, संतोष पोवार, यांना पुस्तक भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार करणेत आला . ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कागले यांनी आभार प्रदर्शन केले .
शांतारामपंत वालावलकर हायस्कूलमध्ये विद्यार्थी बनले शिक्षक
|