बातम्या

नगरपंचायतीने गाळेभाडे वाढ करून गरीब व्यावसायिकांवर अन्याय करू नये-सुनील शिंदे

Sunil shinde


By nisha patil - 1/3/2026 11:50:07 PM
Share This News:



**नगरपंचायतीने गाळेभाडे वाढ करून गरीब व्यावसायिकांवर अन्याय करू नये-सुनील शिंदे*

**आजरा (हसन तकीलदार)*:-आजरा नगरपंचायतीची नुकतीच विशेष साधारण सभा संपन्न होऊन अंदाजपत्रक जाहीर करण्यात आला. यावेळी गाळेभाडे वाढीचा विषयही चर्चेत आला. याला काहींनी विरोधही केला आहे परंतु आजऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी गाळेभाडेवाढ करून गोरगरीब व्यवसयिकांच्या पोटावर मारू नये असे आपले मत मांडले आहे.

 सुनील शिंदे यांनी म्हटले आहे की, आजऱ्याच्या संपूर्ण बाजारपेठेवर नजर टाकली असता ठराविक दुकानदार सोडले तर कोणत्याही दुकानदाराचा व्यवसाय फार तेजीत चाललाय अथवा फार मोठी उलाढाल होत आहे असे दिसत नाही.

नगरपंचायतिमध्ये बहुतांशी गाळे असे आहेत की ज्या ठिकाणी गोरगरीब आपला छोटा-मोठा धंदा करीत आहेत. ज्यामध्ये सलून, भाजीपाला, मुलांचा खाऊ, टेलर, सायकल दुरुस्ती,कांडप यंत्र इतर छोटे व्यावसायिक आहेत त्या गाळ्यांना नगरपंचायतीने लावलेले भाडे आणि लाईट बिल भरताना त्यांची दमछाक होत आहे. अशा अवस्थेत पुन्हा भाडेवाढ करणे म्हणजे ही अन्यायकारक बाब आहे.

   जे बेकार, बेरोजगार, गरीब आहेत ज्यांना व्यवसाय नाही अशा गरीब बेरोजगारांना रोजगार निर्मिती व्हावी याउद्देशाने त्यावेळी ग्रामपंचायतीने या गळ्यांची संकल्पना राबवून अल्प मोबदल्यात गाळे भाड्याने दिली होती. आजही काही युवक रोजगारासाठी आणि आपल्या उपजिविकेसाठी फिरत आहेत. अशा अवस्थेत नगरपंचायतीने भाडेवाढ करून पोट भरणाऱ्या सामान्य व्यावसायिकावर अन्याय केल्यासारखे वाटते. गोरगरीब छोट्या व्यावसायिकांना भाडेवाढ करून आजरा शहराचा पूर्ण विकास होणार का? यापेक्षा आलेल्या कोट्यावधीच्या निधीचा शहराच्या विकासासाठी योग्य आणि पारदर्शक वापर केला पाहिजे. शासनाचा आलेला निधी जर व्यवस्थित आणि योग्य ठिकाणी खर्च केला तर आजरा शहराचा विकास नक्कीच साधता येईल. तेव्हा याचा सारासार विचार होऊन ज्या नूतन नगरसेवकांनी पदभार सांभाळला आहे

त्यांनी भाडेवाढीसारखा प्रश्न हाताळण्यापेक्षा शासनाकडून आलेल्या निधीची विल्हेवाट शहराच्या विकासासाठी योग्य पद्धतीने व्हावी, विकासामध्ये दर्जा असावा, व्यवहारामध्ये पारदर्शकता असावी याकडे लक्ष द्यावे आणि ज्या नगरसेवकांनी भाडेवाढीला विरोध केलाय त्यांनी योग्य पाऊल उचलले आहेत. जनतेच्या भल्यासाठी जनतेने निवडून दिलेले आहे हा विचार मनात ठेऊन जनतेकडून कमीत कमी कर घेऊन निधीचा पुरेपूर वापर करून जनतेला जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा विचार नूतन नगरसेवकांनी करावा.

**तसेच जे लहान खोकीधारक आहेत त्यांना तर भाडेवाढीचा विचारच करू नये परंतु नगरपंचायतीच्या इमारतीतील स्लॅबच्या गाळ्यामध्ये कोणताही व्यवसाय न करता कमी भाड्याने गाळे घेऊन दुसऱ्यांच्याकडून जास्त भाडे घेऊन गाळे भाड्याने देऊन घरबसल्या लुटत आहेत अशा गळ्यांची पाहणी करून,असे गाळे ताब्यात घेऊन गरजवंताना आणि जे खरोखरच याठिकाणी व्यावसाय करणार आहेत त्यांना लिलाव पद्धतीने गाळे भाड्याने द्यावेत असे मत त्यांनी मांडले आहे.*


नगरपंचायतीने गाळेभाडे वाढ करून गरीब व्यावसायिकांवर अन्याय करू नये-सुनील शिंदे
Total Views: 4