बातम्या

*आजरा महाविद्यालयात ज्युनिअर विभागाचा 'शिक्षक-पालक मेळावा' उत्साहात संपन्न

Teacher Parent Meet


By nisha patil - 8/31/2026 8:40:57 PM
Share This News:



*आजरा महाविद्यालयात ज्युनिअर विभागाचा 'शिक्षक-पालक मेळावा' उत्साहात संपन्न
 

*आजरा(हसन तकीलदार):- जनता एज्युकेशन सोसायटी संचलित आजरा महाविद्यालय, आजरा येथील ज्युनिअर विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आयोजित करण्यात आलेला 'शिक्षक-पालक मेळावा' अत्यंत उत्साहात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी, त्यांच्यातील शिस्त व अभ्यासाची सवय वृद्धिंगत करण्यासाठी तसेच महाविद्यालय व पालकांमध्ये सुसंवाद प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने या विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
          ​

कार्यक्रम प्रसंगी प्रा. अर्चना चव्हाण यांनी उपस्थितांचे शब्दसुमानांनी स्वागत करून प्रास्ताविकात मेळाव्याची पार्श्वभूमी मांडली. यानंतर प्रा. श्रद्धा कुलकर्णी यांनी प्राध्यापकांच्या वतीने आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे नियमित अध्ययन, वर्गातील उपस्थिती आणि अभ्यासातील सातत्य यावर भर दिला. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठीचे योग्य अभ्यास नियोजन आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असणारा संतुलित आहार याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
​उपस्थितांमधून पालकांच्या वतीने  मंदार पेंडसे व  अजगेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासाचे वातावरण आणि शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी पालकांच्या बाजूने काही अत्यंत मोलाच्या व विधायक सूचना मांडल्या.
​विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ यांनी, "बदलत्या शैक्षणिक काळात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केवळ महाविद्यालयीन शिक्षण पुरेसे नसून पालक व शिक्षकांमधील सततचा संवाद आणि सहकार्य अत्यंत आवश्यक आहे," असे प्रतिपादन केले. याप्रसंगी त्यांनी महाविद्यालयात राबवल्या जाणाऱ्या 'कॉपीमुक्त अभियाना'ची सविस्तर माहिती दिली. परीक्षा काळातील शिस्त, कॉपीमुक्त शपथ, गैरप्रकार रोखण्यासाठी असणारी शिक्षा सूची आणि सीसीटीव्ही (CCTV) च्या कडक निगराणीखाली पार पडणाऱ्या परीक्षांविषयी मार्गदर्शन करून परीक्षा पूर्णपणे पारदर्शक वातावरणात पार पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

​या प्रसंगी पर्यवेक्षक प्रा. मनोजकुमार पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांची वर्गातील नियमित उपस्थिती, शिस्तबद्ध दिनचर्या आणि महाविद्यालयाच्या नियमांचे पालन करण्याच्या महत्त्वावर विशेष भर दिला. विद्यार्थ्यांनी स्वतःचे ध्येय निश्चित करून अभ्यासात सातत्य ठेवावे आणि पालकांनीही त्यांच्या दैनंदिन प्रगतीकडे सकारात्मकतेने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
 

​कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पोतदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या वतीने पुरवल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगत पालकांना सहकार्याचे आवाहन केले. या मेळाव्यास अधीक्षक  योगेश पाटील, प्रा. वैशाली देसाई, प्रा. अनिल निर्मळे, प्रा. रत्नदीप पवार, प्रा. विनायक चव्हाण, प्रा. डॉ. रणजीत भादवणकर, प्रा. स्वाती माने, प्रा. पुनम लिचम, प्रा. रूपाली फोंडेकर, प्रा. सुवर्णा धामणेकर यांबरोबरच ज्युनिअर विभागातील इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
 

​संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल हाक्के यांनी केले, तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार प्रा. शोभा फड यांनी मानले.


*आजरा महाविद्यालयात ज्युनिअर विभागाचा 'शिक्षक-पालक मेळावा' उत्साहात संपन्न
Total Views: 11